१. त्रास न्यून होण्यासाठी वैद्यकीय उपचारांच्या समवेत नामजपादी उपायही करणे
‘वर्ष २०१३ मध्ये आम्ही ५ – ६ साधिका रामनाथी आश्रमातील पू. पेठेआजींच्या खोलीत रहात होतो. मला रात्री झोप लागत नसे. त्यामुळे मला दुसर्या दिवशी ग्लानी येत असे. मला पोटदुखी आणि जुलाब होत होते. त्यामुळे मला काही खायची इच्छाही होत नव्हती. मला त्रास होत होता; म्हणून काही दिवसांनी माझी ‘सोनोग्राफी’ करण्यात आली. त्यात मला कुठलाही आजार आढळून आला नाही. संत आणि ६१ टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेले साधक माझ्यासाठी नामजपादी उपाय करायला आमच्या खोलीत येत असत. अशा प्रकारे माझ्यासाठी औषधोपचारांच्या (इंजेक्शन्स आणि सलाईन यांच्या) समवेत नामजपादी उपायही चालू होते.
२. ‘सतत होणारा त्रास न्यून व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नामजपादी उपाय लिहून देणे
मला होत असलेला त्रास न्यून होण्यासाठी ‘मी कुठला नामजप आणि न्यास करायला हवा’, ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका पाठकोर्या कागदावर लिहिले आणि एका साधिकेला ‘हा कागद प्रतीक्षाला द्या’, असे सांगितले. त्यांनी लिहून पाठवलेला नामजपादी उपाय येथे दिला आहे.
जप : श्री गुरुचरण
मुद्रा : डोके खाली करून नमस्कार मुद्रा
दिवस : १०
घंटे : प्रतिदिन ५ घंटे (तास)
३. ‘श्री गुरुचरण’ हा जप करणे, म्हणजे निर्गुणाकडेच जाणे’, असे वाटणे
याप्रमाणे मी प्रतिदिन ५ घंटे पालथे झोपून, नमस्कार मुद्रा करून गुरुदेवांनी सांगितलेला नामजप केला. ‘मी गुरुचरणांवर डोके ठेवून ‘श्री गुरुचरण’ हा जप करत आहे’, असाच भाव मी ठेवला. नंतर मला ‘गुरुदेवांचे चरण सोडूच नये’, असे वाटायचे. त्यानंतर ‘त्यांनी मला त्यांच्या कोमल चरणांजवळ ठेवून घेतले आहे’, असे वाटू लागले. ‘श्री गुरुचरण’ हा जप करणे, म्हणजे निर्गुणाकडेच जाणे’, असे मला वाटायचे.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, या वाक्याची आलेली प्रचीती !
हा जप चालू केल्यावर ‘गुरुमाऊलीने त्या पादुका धारण केल्या आहेत’, असे दृश्य मला माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. तेव्हा माझ्या मनात आले, ‘देवा, हीच का ती भावभेट ?’ आणि ‘हेच का ते ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ दर्शवणारे रूप ?’
५. कालांतराने महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते गुरुपादुकांचे पूजन होणे
त्यानंतर १२.२.२०१९ या दिवशी महर्षि भृगु यांच्या आज्ञेनुसार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरुदेवांच्या पादुकांचे पूजन करून गुरुपादुकांची स्थापना केली. ‘जगभरातील साधकांना गुरुपादुकांच्या माध्यमातून चैतन्याचा लाभ व्हावा’, यासाठी महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हस्तस्पर्श केलेल्या गुरुपादुका सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे पाठवण्यास सांगितल्या होत्या. त्या त्या ठिकाणी संत आणि सद्गुरु यांच्याकडून गुरुपादुकांची पूजा करवून गुरुपादुकांची स्थापना करण्यात आली. मला हे सर्व पाहून फार आनंद झाला.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘श्री गुरुचरण’ हा नामजप सांगून त्यांच्या छत्रछायेखाली ठेवल्याचे जाणवून निश्चिंत वाटणे
त्यानंतर मला वाटले, ‘श्री गुरुचरण’ हा नामजप आणि मुद्रा देऊन श्री गुरूंनी मला त्यांच्या छत्रछायेखालीच ठेवले आहे. ते सूक्ष्मातून माझ्याजवळ असल्याने कुणी (अनिष्ट शक्ती) मला स्पर्शही करू शकणार नाही आणि त्रासही देऊ शकणार नाही.’
७.‘श्री गुरुचरण’ या नामजपाचा जाणवलेला भावार्थ
श्री – श्रींना करते नमन ।
गु – गुरूंनी दिले नामस्मरण ।
रु – रूप त्यांचे गोजिरे, सतत पहात रहावे ।
च – चरणांशी त्यांच्या मी शरणागत असावे ।
र – रात्रंदिन घेती आमच्यासाठी कष्ट ।
ण – नारायणा, घे आता उद्धार करून ।।
देवाने अगोदरच माझ्याकडून ‘श्री गुरुचरण’ हा नामजप करून घेतला. माझ्याकडून गुरुस्मरण करवून घेतले. गुरुचरणांना साष्टांग नमस्कार करवून घेऊन मला त्यांच्या चरणांजवळच ठेवले. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुमाऊलीच्या चरणी मानस प्रदक्षिणा घालून आणि कृतज्ञता व्यक्त करून मी पुनःपुन्हा त्यांना भावपूर्ण साष्टांग नमस्कार करते.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२१)
|