१. २६.२.२०२३ या दिवशी आलेली अनुभूती
१ अ. ‘२६.२.२०२३ या दिवशी माझे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळील औदुंबराच्या वृक्षाकडे लक्ष गेले. तेव्हा ‘औदुंबराच्या वृक्षाखाली प्रत्यक्ष दत्तगुरूंचा वास असतो’, या विचाराने माझी भावजागृती झाली.
१ आ. अष्टगंधाचा दैवी सुगंध येऊन दत्तगुरु आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे अन् भावजागृती होणे : मला दत्तगुरु आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवले. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि ‘माझी साधना चांगली व्हावी आणि आपली कृपादृष्टी असावी’, अशी प्रार्थना केली. तेव्हा काही क्षणांतच मला मागील बाजूने अष्टगंधाचा सुगंध येऊ लागला. मी जेथे बसलो होतो, तेथे कुणीही नव्हते, तसेच माझ्या सभोवताली कोणतीच वस्तू नव्हती. हा सुगंध दैवी असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मला निराळ्या प्रकारचा सुगंध आला. माझी दत्तगुरु आणि योगतज्ञ दादाजी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली आणि ते सतत माझ्या पाठीशी असल्याची पुन्हा एकदा प्रचीती आली. (योगतज्ञ दादाजी आणि दैवी सुगंध यांचा घनिष्ठ संबंध आहे. योगतज्ञ दादाजी अनुष्ठानापूर्वी देवतांना आवाहन करायचे किंवा हिमालयातील त्यांच्या गुरुबंधूंशी सूक्ष्मातून बोलायचे. तेव्हा पुष्कळ प्रमाणात दैवी सुगंध यायचा. हे मी तेव्हा अनुभवले होतेे. याविषयी मी त्यांना विचारल्यानंतर ते म्हणायचे, ‘‘सुगंध म्हणजे देवतांचे अस्तित्व. सुगंधाच्या माध्यमातून देवता येतात.’’)
२. २७.२.२०२३ या दिवशी आलेली अनुभूती
२ अ. आश्रमात एके ठिकाणी बसून नामजप करतांना ध्यान लागणे : २७.२.२०२३ या दिवशी ध्यानमंदिरात जागा नसल्यामुळे मी सकाळी ९.३० वाजता आश्रमातील सभागृहात बसून नामजप करत होतो. काही वेळाने माझे मन एकाग्र होऊन माझे ध्यान लागल्यासारखे झाले.
२ आ. ध्यानात योगतज्ञ दादाजी वैशंपायन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : मला ध्यानात दिसले, ‘सभागृहात योगतज्ञ दादाजी वैशंपायन आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) सभागृहात आले. त्यांनी योगतज्ञ दादाजींच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. प.पू. डॉक्टरांनी फिकट पिवळ्या रंगाचा सदरा आणि पांढरा पायजमा घातला आहे.’
२ इ. अष्टगंधाचा सुगंध येणे आणि साधक दत्तमाला मंत्रपठण करत असतांना सूक्ष्मातून योगतज्ञ दादाजी वैशंपायन अन् परात्पर गुरु डॉ. आठवले त्या ठिकाणी आल्याचे दिसणे : मी ध्यानातून बाहेर आल्यानंतर पाहिले, ‘काही साधक सामूहिक दत्तमाला मंत्रपठण करत आहेत.’ त्यानंतर काही क्षणांतच मला अष्टगंधाचा सुगंध आला. ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे सूक्ष्मरूपाने आश्रमात अस्तित्व आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. अतुल केशव पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२३)
|