देहली – ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला माणूस मांसाहार आणि मद्यपान करत जुगार खेळत असेल अन् तो समाज आणि राष्ट्र यांचा विचार करत नसेल, तर त्याला ब्राह्मण कसे म्हणता येईल ? त्यामुळे आपण केवळ जन्माने नाही, तर आपल्या आचरणाने ‘ब्राह्मण’, तसेच ‘हिंदु’ होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. भगवान विष्णूचा ६ वा अवतार भगवान परशुराम यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘ब्राह्मण स्वाभिमान सभे’च्या वतीने येथील श्री चंद्र उदासीन हरिहर आश्रमाच्या शिवमंदिरामध्ये ‘सुंदरकांड’ पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या वेळी मंदिराचे महंत मंगलदास उदासीनजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री. ब्रिजेश शर्मा यांनी केले.
आपण धर्माप्रमाणे आचरण करू, तेव्हाच धर्माचे रक्षण होईल ! – सद्गुरु डॉ. पिंगळे
विराट पुरुषाचे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र हे चारही वर्ण पूजनीय आहेत. सध्या हिंदु समाजातील विषमता नष्ट करून त्याला सर्व वर्णांसमवेत जोडण्यासाठी ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे. ब्राह्मण हा इतर वर्णांहून वेगळा नाही; परंतु सर्व वर्ण मिळून आपला हिंदु समाज सिद्ध होतो. केवळ धर्म जाणून घेतल्याने किंवा त्याचा अभ्यास केल्याने धर्माचे रक्षण होणार नाही. देवाने आपला धर्म, वेद आणि संस्कृती यांच्या रक्षणाचे दायित्व आपल्या सर्वांवर टाकली आहे. जेव्हा आपण धर्माप्रमाणे आचरण करू, तेव्हाच धर्माचे रक्षण होईल.
वर्णांमध्ये भेद निर्माण करणार्यांची कारस्थाने उघड करण्याचे दायित्व ब्राह्मण ! – सद्गुरु डॉ. पिंगळे
केवळ परशुरामच नव्हे, तर सर्व श्रद्धास्थाने, अवतार आणि देवीदेवता आपल्यासाठी पूजनीय आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या प्रतिष्ठा रक्षणाचे दायित्व आपल्यावर आहे. भाषाशास्त्रानुसार जो वर्णासह आहे तो सवर्ण ! त्यामुळे त्यात वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेद होऊ शकत नाही. तसेच सर्व वर्णांमध्ये भेद निर्माण करणारे ब्रिटीश, साम्यवादी आणि डावे यांची कारस्थाने उघड करण्याचे दायित्व ब्राह्मणांसह सर्व वर्णियांचे आहे. शुद्ध धर्माचे पालन करणार्याने ब्राह्मण जातीचे अनुयायी निर्माण करण्याचा प्रयत्न न करणे अत्यंत क्लेशदायक आहे. त्यामुळे भारताला धर्मावर आधारित हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे.