श्रीनंदाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली नोंद !
नागपूर – येथील चि. श्रीनंदा देशकर (वय दीड वर्ष) ही अनेक वस्तू पटापट ओळखते. ती प्राणी आणि पक्षी यांची नावे सांगते. इतकेच नव्हे, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दाखवल्यानंतर ती लगेच ‘हे मोदीजी आहेत’, असे सांगते. तिच्या या कर्तृत्वाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. चि. श्रीनंदा ही २००हून अधिक वस्तूंची ओळख किंवा त्यांची नावे सांगते. चि. श्रीनंदा हिने १२ हिंदु देवतांची नावे लगेच ओळखली.
श्रीनंदा देशकर हिने मराठी आणि इंग्रजी यांमध्ये १५६ वस्तूंची नावे, दृश्य आणि तोंडी ओळखून दाखवत ‘प्रशंसा श्रेणी’ अंतर्गत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये प्रवेश मिळवला. चि. श्रीनंदा ही घरगुती वस्तू (४४), प्राणी आणि पक्षी (३१), खाद्यपदार्थ (२३), शरिराचे अवयव (१२), हिंदु देवता (१२), फळे (११), भाज्या (८) आणि वाहने (६) या सर्व वस्तूंची बिनचूक ओळख तिने केली.
प्राणी आणि पक्षी यांच्या आवाजासह २०० हून अधिक वस्तू ओळखते !
वेगवेगळ्या प्राण्यांची नावे सांगतांना ते प्राणी कसे आवाज काढतात ? किंवा फळांची नावे सांगतांना त्यांची चव कशी असते ?, हेही ती सांगते. देशकर कुटुंबीय हे संयुक्त कुटुंब पद्धतीत रहाते. श्रीनंदाच्या घरी आई-वडिलांसमवेत, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा, तसेच काका आहेत. त्यामुळे तिचा या कुटुंबातील सदस्यांसमवेत प्रतिदिन संवाद होत असतो. त्यामुळे तिच्यात बोलणे, वस्तू ओळखणे आणि संवाद साधणे या गुणांचा विकास झाला. अवघ्या ९ मासांची असतांना ती आपल्या आजोबांसमवेत वृत्तपत्रातील चित्रे पहायला शिकली. त्यानंतर तिला या गोष्टीत आवड आहे, हे घरच्यांच्या लक्षात आले.