बोरगाव पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न अजूनही प्रलंबितच !

पोलिसांच्या निवासाचा प्रश्न प्रलंबित का आहे ? पोलिसांना निवासच व्यवस्थित नसेल, तर त्यांची फलनिष्पत्ती कधी तरी अधिक असू शकते का ?

सातारा, १ मे (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव येथील ५९ गावांचे कार्यक्षेत्र असलेले बोरगाव पोलीस ठाणे अत्यंत महत्त्वाचे पोलीस ठाणे आहे. गुन्हेगारी, अपघात, वाहतूक, राजकीय सभा, सण, यात्रा बंदोबस्त अशा अनेक गोष्टींमुळे येथील पोलीस कर्मचारी नेहमीच तणावात असतात. २४ घंटे जनतेच्या रक्षणाचे कार्य करणार्या बोरगाव पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न मात्र गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

काही वर्षांपूर्वी महामार्गाच्या रुंदीकरणात १५-२० खोल्या गेल्या. नंतर या ठिकाणी केवळ ६ खोल्या पोलिसांसाठी राहिल्या. त्यांतीलही केवळ ३ खोल्या रहाण्यास योग्य असून उर्वरित ३ खोल्या दुरुस्तीअभावी बंद आहेत. बोरगाव पोलीस ठाण्याची निवासी इमारत अत्यंत जुनी झाली असून दुरुस्तीअभावी मोडकळीस आली आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यांची संख्या ४२ असून त्यातील १० महिला पोलीस कर्मचारी आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस निवासस्थानांच्या इमारतींचा प्रश्न प्रलंबित असून जुन्या इमारतींच्या जागेवरच नवीन इमारती बांधून हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. यामध्ये गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा सातारा पोलीस दलातील कर्मचारी व्यक्त करत आहेत.