गोवा : टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी ?

पणजी, २८ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी यांना घेराव घातला. गोव्यात किती टँकर आहेत ? त्यांचे पाणी कोणत्या दर्जाचे आहे ? या पाण्याची तपासणी केली जाते का ? अशा प्रश्नांचा भडिमार कार्यकर्त्यांनी बदामी यांच्यावर केला.

त्यावर बदामी म्हणाले, ‘‘टँकरचे पाणी जरी लोकांना पुरवले जात असले, तरी सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे आम्ही या पाण्याच्या संदर्भात निश्चिती देऊ शकत नाही.’’ हे पाणी लोकांनी पिऊ नये’, असे बदामी यांनी सांगितल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

 (सौजन्य : RDXGOA GOA NEWS)

कार्यकर्ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात उन्हाळा चालू होण्याच्या अगोदरच पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. पिण्यायोग्य पाणी पुरवण्यास सरकार असमर्थ ठरले असल्याचे त्यातून सिद्ध होते. त्यामुळे प्रदूषित पाणी देणार्‍या टँकरना सरकारचे अभय राहिले आहे.’’

मैला वाहून नेणार्‍या टँकरमधले पाणी पाण्याच्या टँकरमध्ये भरणार्‍यांवर वेर्णा येथे गुन्हा नोंद

मडगाव, २८ एप्रिल (वार्ता.) – मैला वाहून नेणार्‍या टँकरमधले पाणी पाण्याच्या टँकरमध्ये भरण्याची कृती करून रोग पसरवण्याचा प्रयत्न केल्याविषयी ४ जणांवर वेर्णा पोलिसांनी प्रथमदर्शनी गुन्हा नोंद केला आहे.

(सौजन्य : Gomant Varta live) 

नाझीर सय्यद, हजरत बिरादर, झबी उल्ला आणि जयराम अशी या चौघांची नावे असून ते झुआरीनगर येथील रहिवासी आहेत.