असे आदेश का द्यावे लागतात ? पालिका प्रशासन यावर स्वत:हून कारवाई का करत नाही ?
पुणे – रावेत येथील होर्डिंग्ज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनधिकृत होर्डिंग्जवर त्वरित कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदा, नगरपंचायत यांच्या अधिकार्यांनी कारवाई करावी, असे आदेशात सांगितले आहे.
तालुक्यातील संबंधित गटविकास अधिकारी आणि नगरपालिका किंवा नगरपंचायती यांच्या मुख्याधिकार्यांनी स्थापत्य अभियंत्याने प्रमाणित केलेला दाखला सादर केल्यानंतरच फलक उभारण्यास अनुमती द्यावी. लावलेल्या सर्व विज्ञापनांच्या फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण अहवाल पुन्हा नव्याने घेऊन त्याचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करावा. ग्रामीण भागातील स्थापत्यविषयक लेखापरीक्षण न केलेले होर्डिंग्ज अनधिकृत समजून ते त्वरित काढून टाकावेत, असेही वरील आदेशात स्पष्ट केले आहे.