पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणीस प्रारंभ !

पुढील सुनावणी ५ जुलै २०२३ ला होणार

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर २८ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली. या वेळी डॉ. स्वामी यांनी स्वत: बाजू मांडली, तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने अधिवक्ता जनरल वीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. या वेळी स्वामी यांनी ‘अनुच्छेद ३१ ए आय आणि बी नुसार सार्वजनिक हितासाठी किंवा मालमत्तेचे व्यवस्थापन मर्यादित कालावधीसाठी राज्याद्वारे कह्यात घेणे, हे घटनेच्या मूळ तत्त्वापासून फारकत घेणारे आहे’, असे मत मांडले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जुलै या दिवशी होेणार आहे.

सुनावणीनंतर डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचे ट्वीट !

महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पक्षाच्या विचारसरणीचा आदर करत नाही, ही भाजपच्या प्रमाणिक कार्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कह्यात घेण्याच्या संतापाविषयी महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना बडतर्फ करा, असे कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाला सांगावे.