इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्‍वरहून १ दिवस आधी प्रस्थान होणार !

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज

नाशिक – आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी पालखी त्र्यंबकेश्‍वरहून पंढरपूरला जाते. यात सहस्रो वारकरी सहभागी होतात; मात्र वारकर्‍यांच्या सोयीच्या दृष्टीने, तसेच दिंडीच्या मानकर्‍यांच्या मागणीनुसार यंदा एक दिवस आधीच पालखी त्र्यंबकेश्‍वरहून प्रस्थान करणार आहे. इतिहासात प्रथमच असे होत आहे. एक दिवस मुक्कामाचे ठिकाणही वाढवण्यात आले आहे. हा मुक्काम संत निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु गहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी असेल.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी

१. यंदा २ ते २८ जून या कालावधीत आषाढी वारी असून त्यात ४२ हून अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत. त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास ४०० किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी मंडळी प्रतिदिन अंदाजे २० किलोमीटर पायी चालतात.

२. प्रतिवर्षी चतुर्दशीच्या दिवशी पालखीचे होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला, म्हणजेच २ जूनला होणार आहे. २८ जून या दिवशी पालखी पंढरपूरला पोचेल. त्यानंतर ३ जुलै या दिवशी परतीचा प्रवास चालू होऊन २० जुलै या दिवशी पालखीचे त्र्यंबकेश्‍वर येथे आगमन होईल.

३. यंदा कडक उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर, तसेच वारकर्‍यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विविध समित्यांची स्थापनाही निवृत्तीनाथ संस्थानच्या वतीने केली जाणार आहे.