पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
छत्रपती संभाजीनगर – शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर साहाय्यक प्राध्यापक अशोक बंडगर याने बलात्कार केल्याची घटना २५ एप्रिल या दिवशी उघडकीस आली होती. बंडगर याच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. आता विद्यापीठ प्रशासनानेही या घटनेची गांभीर्याने नोंद घेत कुलगुरूंच्या आदेशाने अशोक बंडगरला निलंबित केले आहे. समवेत या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
आधी घरात आसरा दिला मग नरक यातना…#teacher #news https://t.co/HVfJ6HdNN9
— LoksattaLive (@LoksattaLive) April 27, 2023
वसतिगृहात रहाणे सुरक्षित नसल्याचे सांगत शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या पीडित विद्यार्थिनीला घरी ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहाण्यास अशोक बंडगर आणि त्याच्या पत्नीने जागा दिली; मात्र पुढे घरी रहाण्यासाठी नेऊन तिच्यावर अशोक बंडगर याने आपल्या पत्नीच्या सहमतीने बलात्कार केला. या दोघांनी संगनमताने माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केला आहे. सध्या हे दोघेही पसार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
बंडगरविषयी आणखी एक माहिती समोर येत असून त्याने वर्ष २०१९ मध्ये बंगालच्या एका विद्यार्थिनीवर त्याच्या पदाचा अपवापर करून अत्याचार केला होता. याविषयी पीडित मुलीने कुलगुरु यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. या वेळी कुलगुरूंनी तिला तक्रार देण्यासाठी सांगितले होते; मात्र मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार देण्यासाठी नकार देत पीडित मुलीचा प्रवेश रहित करून घरी घेऊन गेले. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आले नव्हते.