अमेरिकेचे जागतिक स्तरावरील सर्वाेच्च स्थान धोक्यात आहे का ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

जर अमेरिकेला जागतिक स्तरावर सर्वाेच्च स्थानी रहायचे असेल, तर तिने स्वतःचे लक्ष जागतिक स्तरावर स्वतःचा प्रभाव असणार्‍या विस्तारवादी चीनवर ठेवले पाहिजे. ऑक्टोबर २०२२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या ४८ पानी राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरणाविषयीच्या लिखाणामध्ये म्हटले आहे, ‘‘चीन हे एकमेव राष्ट्र आहे, ज्याचा हेतू आंतरराष्ट्रीय क्रम पालटणे असून त्याकरता आर्थिक, राजकीय, लष्करी आणि तांत्रिक क्षमता वाढवून हे ध्येय गाठणे असा आहे.’’ त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये स्पष्टपणे ‘अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला चीन हा सर्वांत अधिक सर्वसमावेशक आणि गंभीर आव्हान आहे’, असे म्हटले आहे. तरीही युक्रेनच्या प्रश्नावरून रशियाविरुद्धच्या अप्रत्यक्ष युद्धाकडे अमेरिका अधिक प्रमाणात गुंतली आहे. त्यामुळे चीनकडून दिल्या जाणार्‍या प्रमुख आव्हानापासून अमेरिकेचे लक्ष दुसरीकडे वळले आहे. रशिया-युक्रेन युद्धामध्ये युद्धभूमीवर दोन्ही बाजू काही प्रगती करत नसतांना आणि या युद्धाविषयी उदासीन वातावरण असतांना युद्धबंदीविषयी प्रस्ताव पुढे करण्याऐवजी अमेरिका अन् संबंधित राष्ट्रे नवीन भरती झालेल्या युक्रेनच्या सहस्रो नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देत आहेत. एवढेच नव्हे, तर युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवून रशियाने कह्यात घेतलेला युक्रेनचा भाग परत मिळवण्यासाठी साहाय्य करत आहेत.

प्रा. ब्रह्मा चेल्लानी

१. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या डावपेचांत चीन तैवानवर आक्रमण करण्याची शक्यता

डिसेंबर २०२२ पासून पश्चिमी राष्ट्रे त्यांच्या शस्त्रास्त्रांपैकी ४० टक्के शस्त्रास्त्रे युक्रेनला युद्धासाठी पाठवत आहेत. त्यामुळे युक्रेनला पुष्कळ प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवली जात आहेत; परंतु आता आक्रमण हे संरक्षणापेक्षा कठीण झाले आहे. युक्रेनच्या सैन्याकडून केलेल्या आक्रमणामध्ये (ज्यामध्ये पश्चिमी राष्ट्रांकडून नवीन शस्त्रे पुरवली जात आहेत आणि सैन्यही नवीन भरती केलेले आहे) दोन्ही बाजूंकडील सैनिक अधिक प्रमाणात घायाळ होतील. खरे म्हणजे युक्रेन जेवढ्या प्रमाणात हे युद्ध लांबवेल तेवढे त्याचे दोन परिणाम होतील. ते म्हणजे रशिया आणि चीन पाश्चात्त्य राष्ट्रांविरुद्ध डावपेच आखण्यात एकत्र येतील अन् चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग तैवानवर आक्रमण करतील.

२. डावपेचात्मक परिणामामध्ये अमेरिकेची घसरण होण्याचा धोका

यापूर्वी झालेल्या शीतयुद्धातील दुसर्‍या भागात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सॉन यांनी चीनला प्रवेश दिल्यानंतर अमेरिकेने रशियाविरुद्ध चीनला सहभागी केले आणि हळूहळू चीन अन् अमेरिका संबंध अनौपचारिक युतीमध्ये पालटले. या युतीने रशियाचा प्रभाव न्यून करण्यासाठी प्रयत्न केले. या दोन विरुद्ध एक अशा स्पर्धेमुळे रशियाच्या साम्राज्यावर ताण आला आणि या शीतयुद्धात प्रत्यक्ष युद्ध न करता पश्चिमी राष्ट्रांचा विजय झाला. आता पुन्हा दोन विरुद्ध एक अशी स्पर्धा परत चालू होत आहे; परंतु या वेळी चीन आणि रशिया अमेरिकेच्या विरुद्ध एकत्र आले आहेत.

यापुढे अमेरिकेच्या प्रशासनाने रशिया आणि चीन यांच्याशी एकाच वेळी सामना करणे टाळले पाहिजे अन् त्याऐवजी एकाचा दुसर्‍याच्या विरुद्ध वापर केला पाहिजे; परंतु तरीही अमेरिकेच्या धोरणामुळे त्याचे चीन आणि रशिया हे स्पर्धक डावपेचात्मक धोरणामध्ये भागीदार आहेत. याचा परिणाम म्हणजे डावपेचात्मक परिणामामध्ये अमेरिकेची घसरण होण्याचा धोका आहे.

३. रशिया-अमेरिका वादात चीनचे डावपेच

अमेरिकेच्या निर्बंध घालण्याच्या धोरणामुळे चीन आणि रशिया यांच्यामधील लाभदायक ठरत असलेल्या भागीदारीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे नैसर्गिकपणे धोरणात्मक दृष्टीने अमेरिका चीनमध्ये फूट पडत आहे. चीनचा मुख्य भर जपानपासून ते दक्षिण पूर्व आशिया ते भारतापर्यंत स्वतःची सीमा पसरवण्यावर, तर रशियाचे लक्ष पूर्व आणि मध्य युरोपवर आहे. रशिया त्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या सीमेवर स्वतःचा प्रभाव परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चीन सुधारणावादाच्या नावाखाली स्वतःच्या आजूबाजूच्या परिसरावर विशेषतः तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि भारत यांच्यावर वर्चस्व मिळवणे हा हेतू आहे. आज रशिया अमेरिकेला अडवण्याचा प्रयत्न करत असतांना शी जिनपिंग यांना त्यांची ‘बलपूर्वक तैवान घशात घालणे’, ही ऐतिहासिक मोहीम करण्यासाठी डावपेच आखण्यास पुष्कळ वाव आहे.

शी जिनपिंग हे जगातील भरभराटीला आलेली लोकशाही आणि ‘सेमीकंडक्टर’ (इलेक्ट्रॉनिक भाग) मधील ‘जगातील महासत्ता’ असलेल्या तैवानविरुद्ध चाल करण्याची दाट शक्यता आहे. तैवानमधील ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’चा जागतिक स्तरावर सर्वांत प्रगत सेमीकंडक्टर देण्यात ९० टक्के वाटा आहे. जर चीनने ही कंपनी स्वत:च्या कह्यात घेतली, तर अमेरिकेच्या लष्करी आणि तांत्रिक नेतृत्वावर दबाव आणण्याखेरीज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चीन अधिक प्रमाणात अडथळा निर्माण करील.

४. तैवान हा चीनचा प्रमुख प्रश्न असल्याचे शी जिनपिंग यांनी अमेरिकेला ठणकावून सांगणे

शी जिनपिंग तिसर्‍यांदा चीनचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी निःसंदिग्धपणे त्यांच्या राष्ट्रीय धोरणाला जोर आणण्यात यश मिळण्यासाठी तैवानशी जोडले आहे. ‘मातृभूमीचे एकत्रीकरण करणे, हे राष्ट्रीय धोरणाला पुढे आणण्याचे मुख्य सार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या साम्यवादी राजवटीत त्यांनी तैवानच्या सीमेवर हवाई आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी नवीन आश्रयस्थाने निर्माण करणे, लष्करी सज्जतेविषयी नवीन कायदे करणे, राखीव सैन्यातील सैनिकांना सहजपणे सक्रीय करू शकणे आणि देशभरात कुठेही कार्यालय हलवता येणे, असे शक्य असणारे पालट केले.

डावीकडून शी जिनपिंग आणि जो बायडेन

शी जिनपिंग गेल्या मासात म्हणाले, ‘‘चीनने शीतयुद्ध आणि भौगोलिक दृष्टीने लढा देण्याविषयी नवीन स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.’’ चीनचे भूतपूर्व अध्यक्ष ली केकिआंग यांनी त्यांचे कार्यालय सोडतांना युद्धासाठी सिद्धता ठेवण्याचे आवाहन केले होते. दक्षिण चिनी समुद्र आणि हिमालयाच्या भूप्रदेशामध्ये पालट केल्यानंतर आता शी जिनपिंग यांना ‘अमेरिकेशी संघर्ष होईल’, हे ठाऊक असूनही ते तैवानवर अतिक्रमण करण्याची इच्छा धरून आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये बाली, इंडोनेशियामध्ये शी जिनपिंग यांना भेटण्यापूर्वी जो बायडेन यांनी ‘बीजिंगशी झालेल्या तणावपूर्ण स्थितीविषयी प्रामुख्याने चर्चा करण्याची इच्छा आहे’, असे म्हटले होते; परंतु जिनपिंग यांनी तैवानचा उच्चार केला. या बैठकीत चीनने वाचलेल्या आपल्या भूमिकेमध्ये जिनपिंग यांनी ‘तैवान हा चीनचा प्रमुख प्रश्न आणि चीन अन् अमेरिका यांमधील राजकीय संबंधाचा पाया असून त्या संबंधामध्ये अमेरिकेने ही लाल रेषा (तैवान प्रश्नाची रेषा) ओलांडू नये’, असे म्हटले आहे.

५. चीनने अमेरिकेला ‘शत्रू’ संबोधणे आणि अमेरिकेचा तैवानविषयीचा दृष्टीकोन

गेल्या मासात चीनमध्ये झालेल्या एका भाषणामध्ये शी जिनपिंग यांनी अमेरिकेला ‘शत्रू’ संबोधून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी हातमिळवणी केली. या वेळी त्यांच्यामध्ये झालेल्या ९ सूत्री विधानामध्ये अमेरिकेला स्पष्टपणे ‘आपला शत्रू’ किंवा ‘प्रतिस्पर्धी’ संबोधले आहे. या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाच्या दृष्टीने चीन जगातील व्यवस्था पालटून तैवानवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक दाट झाली आहे; परंतु तैवानचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे स्रोत पुरवण्याऐवजी अमेरिका चीप सिद्ध करणार्‍या तैवानवर अवलंबून रहाण्याविषयीची काळजी करत आहे. कोट्यवधी डॉलर्सचे साहाय्य देण्याविषयी अमेरिकेतील आस्थापनांनी दिलेल्या वचनानुसार अमेरिका स्वतःची चीप सिद्ध करण्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. चीप सिद्ध करण्याची क्षमता वाढवण्याचा संबंध रशियाने वर्ष १९५७ मध्ये ‘स्फुटनिक’ उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर अमेरिकेने त्याच्याशी पुकारलेल्या शीतयुद्धासंबंधी केलेल्या गुंतवणुकीशी आहे.

६. अमेरिकेने युक्रेन युद्धामध्ये गुंतणे म्हणजे चीनच्या विस्तारवादाला वाव मिळणे

मूलतः अमेरिका स्वतःवरील डावपेचात्मक ताणाचा निर्देश करत असून युरोपच्या सुरक्षिततेमध्ये अडकून तो ताण किंवा कटूता वाढवू इच्छित नाही. सध्या रशियाची प्रादेशिक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी आणि अमेरिकेला ‘जगातील महासत्ता’ बनण्यासाठी अमेरिकेशी स्पर्धा करणार्‍या चीनच्या मोहिमेची किंमत द्यावी लागत आहे. जेवढी अमेरिका युक्रेन युद्धामध्ये गुंतेल, तेवढा चीनला त्याचा विस्तारवाद वाढवण्यासाठी आणि धोरणात्मक दृष्टीने त्यांची लष्करी अन् आर्थिक सत्ता वाढवण्यासाठी अधिक वाव मिळेल.

असे असले, तरी जो बायडेन यांनी तैवानच्या स्थितीमध्ये एकतर्फी होऊ पहाणार्‍या पालटाला विरोध करत लष्करीदृष्टीने त्याचे संरक्षण करण्याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाहीत. परिणामी तैवानवर आक्रमण करण्यास चीनला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असून त्यामुळे अमेरिका आश्चर्यचकित होईल.

७. नवीन जागतिक क्रमवारी सिद्ध होण्याची शक्यता ?

खरे पहाता अमेरिकेचा तैवानमधील हस्तक्षेप, तसेच युक्रेनला पाठिंबा दिल्यानंतर अमेरिकेच्या युद्धसामुग्रीमध्ये जलदपणे होणारी घट आणि ती भरून काढण्याची क्षमता नसल्याने वॉशिंग्टनला धोका निर्माण होण्याची इच्छा शी जिनपिंग धरून आहेत. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाने आंतरराष्ट्रीय क्रमवारीचा पाया हलला आहे. जर चीनने तैवान कह्यात घेतले, तर अमेरिका आणि संबंधित राष्ट्रांचे वर्चस्व न्यून होईल अन् नवीन जागतिक क्रमवारी सिद्ध होईल. पहिल्या महायुद्धानंतर जसा २० व्या शतकाचा मार्ग पालटला, त्याप्रमाणे २१ व्या शतकाचा मार्ग पालटेल.

– प्रा. ब्रह्मा चेल्लानी, नवी देहली (११.४.२०२३)

(साभार : https://chellaney.net/)

(प्रा. ब्रह्मा चेल्लानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ या केंद्रात ‘स्ट्रेटेजिक स्टडीज’ (धोरणात्मक अभ्यास) या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांना बर्लिन (जर्मनी) येथील ‘रॉबर्ट बॉश अकादमी’ ही शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांनी एकूण ९ पुस्तके लिहिली आहेत.)

संपादकीय भूमिका

चीनचे विस्तारवादी धोरण भारतासह जगाला डोकेदुखी असून त्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन काटशह देणे आवश्यक !