|
जालना – क्यू.आर्.व्ही. (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) पथकाचे सदस्य वाहन चालकांसारखा पोशाख करून जालना समृद्धी महामार्गावरील पथकर नाक्यापुढील कडवंची गावाजवळील लाकडी शेडच्या उपाहारगृहात गेले. चहा घेतल्यानंतर दारू मिळेल का ? अशी विचारणा उपाहारगृह चालकाकडे करताच त्यांना १२० रुपयांची एक देशी दारूची बाटली दिली. या सर्व प्रकाराचा भ्रमणभाषमध्ये व्हिडिओ काढून पथकाने ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’च्या प्रमुखांना पाठवला आहे. महामार्ग पोलिसांनी या अवैध दारू विक्रीविषयी पोलीस अधीक्षकांनाही ई-मेल केला आहे.
यामुळे आता हे अधिकारी काय कारवाई करतात ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघातग्रस्तांजवळ जाण्यासाठी २१ क्यू.आर्.व्ही. वाहने विविध पथकर नाक्यांजवळ उभी केली आहेत.
या महामार्गावर सिलिंडर वापरू नये, चहा विक्रीसाठी पेट्रोल पंप चालकांनीच थर्मासमध्ये चहा द्यावा, असे आदेश उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर्.एल्. मोपलवार यांनी काढले आहेत. मोपलवार यांनी या मार्गावर फिरून पहाणी केली; पण या हॉटेलमध्ये ३ सिलिंडर सापडले.
अपघात झाल्यास साधा संपर्क…
समृद्धी महामार्गावर वाहनाचा बिघाड अथवा अपघात झाल्यास हेल्पलाईन क्रमांक १८००२३३२२३३ आणि ८१८१८१८१५५ या क्रमांकावर त्वरित संपर्क करावा.
काय आहे क्विक रिस्पॉन्स व्हेईकल ?एम्.एस्.आर.डी.सी. अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला क्यू.आर्.व्ही. (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) या विभागाअंतर्गत इंधन संपल्यावर इंधन संबंधित वाहनापर्यंत आणून देणे, टायर पंक्चर झाल्यास पंक्चर काढणार्या व्यक्तीला संबंधित ठिकाणापर्यंत पोचवण्याची सोय करून देण्यासाठी, तसेच अपघातग्रस्त वाहनांच्या चालक आणि घायाळ झालेल्यांना साहाय्य करण्यासाठी नागपूर ते मुंबई अशी २१ वाहने सक्रीय केली आहेत. |