गोवा राज्य विदेशी मंत्र्यांच्या ‘एस्.सी.ओ.’ बैठकीसाठी होत आहे सिद्ध !

‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (‘एस्.सी.ओ.’) विदेशी मंत्र्यांची बैठक

पणजी, २४ एप्रिल (वार्ता.) – ‘जी २०’ शिखर परिषदेच्या आरोग्य कार्यगटाची बैठक यशस्वी झाल्यानंतर गोवा राज्य आता ४ आणि ५ मे या दिवशी गोव्यात होणार्‍या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (‘एस्.सी.ओ.’) विदेशी मंत्र्यांच्या बैठकीसाठी सिद्ध होत आहे. ‘जी २०’ शिखर परिषदेच्या गोव्यात होणार्‍या विविध बैठकांच्या आयोजनासाठी गोवा राज्याच्या प्रशासकीय अधिकार्‍यांचा एक गट केंद्राशी सातत्याने समन्वय करत आहे आणि याच गटाला ‘एस्.सी.ओ.’च्या बैठकीच्या आयोजनाच्या सिद्धतेचे दायित्व देण्यात आले आहे.

‘एस्.सी.ओ.’ गटामध्ये रशिया, भारत, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गीझस्तान, तजाकिस्तान आणि उजबेकिस्तान या ८ सदस्यांचा समावेश आहे. हा गट २० वर्षे जुना आहे. या गटाचे अध्यक्षपद सप्टेंबर २०२२ मध्ये भारताला मिळाले. ही बैठक बाणावली येथील एका हॉटेलमध्ये होणार आहे.

‘एस्.सी.ओ.’ बैठकीत ८ देशांचे विदेशमंत्री सहभागी होणार आहेत आणि यामध्ये रशिया, पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांच्या विदेशमंत्र्यांचाही सहभाग आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सिद्धताही केली जात आहे.