नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या !
नाशिक – प्रति १२ वर्षांनी नाशिक येथे कुंभमेळा होत असतो. त्यानिमित्ताने ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळख असलेली गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी ‘नमामि गोदा’ हा प्रकल्प घोषित करण्यात आला होता. त्यासाठी केंद्रासह राज्य सरकारही आर्थिक हातभार लावणार आहे. गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा वाटा असणार आहे. यातून गोदावरी नदीत जाणारे दूषित पाणी रोखले जाणार आहे. वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेला प्रकल्प नाशिक येथे राबवला जाणार आहे. त्याच धर्तीवर गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. याविषयी अहवाल सिद्ध करणे आणि आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळा उत्तम होणे यांसाठी महापालिका प्रयत्नरत आहे. ऑगस्ट मासाच्या अखेरपर्यंत या प्रकल्पाचा अहवाल सादर केला जाईल.
१. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी आणि तिला जोडलेल्या उपनद्या प्रदूषणमुक्त करण्यावर भर दिला जात आहे.
२. नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके याविषयी आढावा घेत आहेत.
३. ‘नमामि गोदा’अंतर्गत घाट परिसराचे सुशोभिकरणही केले जाणार आहे. जुन्या घाटांचे संवर्धन करत असतांना नव्या घाटाची निर्मितीही केली जाणार आहे. यामध्ये दूषित पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्याच्या प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे.
४. रामकुंड परिसरात येणारे पाणी स्वच्छ रहाण्यासाठी प्रयत्न केले जातील.
५. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू असून समुपदेशक नेमण्यात आले आहेत. हा प्रकल्प आगामी काळात पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे.