१. काश्मीरमधील अच्छन गावच्या एकमेव हिंदु कुटुंबातील संजय शर्मा यांची हत्या
‘काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील एक काश्मिरी हिंदु संजय शर्मा यांची हत्या झाली. त्यांचा हिंदु असणे, एवढाच दोष होता. याच दोषामुळे यापूर्वीही अनेक काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. हे हत्यासत्र कधी थांबेल ? हे सांगणे कठीण आहे; कारण काश्मीरमध्ये वाचलेल्या थोड्याबहुत काश्मिरी हिंदूंच्या संरक्षणाचे दावे अजूनही सिद्ध होत नाहीत. काश्मिरी हिंदूंसाठी काश्मीर हा अफगाणिस्तानसारखा सिद्ध होत आहे. ज्याप्रमाणे तेथे थोडे हिंदू आणि शीख शेष राहिले आहेत, तीच स्थिती काश्मीरमध्येही आहे.
संजय शर्मा यांचे कुटुंब त्या मोजक्या काश्मिरी हिंदूंमधील होते, ज्याने आतंकवाद एका टप्प्यावर असतांना आणि काश्मिरी हिंदूंना निवडून लक्ष्य करण्यात येत असतांना काश्मीर सोडले नव्हते. त्यांना कदाचित त्यांच्या जवळपासचे लोक आणि काश्मीरची सुरक्षा यांवर विश्वास असेल; पण संजय शर्मा यांना या विश्वासाची किंमत स्वत:चा जीव देऊन चुकवावी लागली. अशाच प्रकारे किंमत चुकवणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ते मागील ३-४ मासांपासून कामावर जात नव्हते. तरीही ते वाचू शकले नाहीत. ते पुलवामाच्या अच्छन गावात रहाणारे होते. एकेकाळी या गावात अनुमाने ६० काश्मिरी कुटुंबे रहात होती; परंतु आतंकवादामुळे त्यांनी तेथून पलायन केले. या गावात संजय शर्मा यांचे कुटुंब एकमेव शिल्लक राहिले होते. संजय शर्मा यांच्या हत्येनंतर त्यांच्या ३ भावांना लक्षात येत नाही की, त्यांनी तेथून पलायन करावे कि तेथेच रहावे ? संपूर्ण गावात एकमेव हिंदु कुटुंब रहाणे, हे आतंकवाद्यांना सहन झाले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
२. काश्मिरी हिंदु कर्मचार्यांनी काश्मीर सोडू नये; म्हणून प्रशासनाने त्यांचे वेतन बंद करणे
संजय शर्मा यांच्या हत्येनंतर जम्मू-काश्मीर प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्यासाठी काश्मीरमध्ये रहात असलेल्या मूठभर काश्मिरी हिंदूंनी घरदार सोडून पलायन करण्याचा विचार करू नये, हे त्यांना समजावणे कठीण होईल. त्यामुळे तेथे थोडेफार उरलेले काश्मिरी हिंदू काय विचार करत असतील ? हे सांगता येत नाही. जेव्हा मागील वर्षीपासून एका पाठोपाठ काश्मिरी हिंदू मारले गेले, तेव्हा त्यांच्या एका समुहाला काश्मीर सोडण्यातच त्यांचे खरे हित आहे, याची जाणीव झाली होती. ते सरकारी कर्मचारी होते आणि काश्मीर सोडण्यापूर्वी त्यांचे जम्मू येथे स्थानांतर करण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावली. त्यानंतरही ते काश्मीर सोडून जम्मूला आले. त्यामुळे प्रशासनाने त्यांचे वेतन थांबवले. असे करून प्रशासनाने त्यांना काश्मीरमध्ये जाऊन नोकरी करण्यासाठी बाध्यच केले होते. या हतबलतेमुळे काही जण काश्मीरमध्ये परतलेही होते; परंतु तेथे त्यांना किती सुरक्षित वाटत असावे, हे सांगणे कठीण आहे.
३. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंना वसवल्याविना तेथे निवडणुका घेऊ नये !
जवळपास ३ मासांपूर्वी ‘पंतप्रधान विकास पॅकेज’च्या अंतर्गत काश्मीर खोर्यात काम करणार्या ५६ काश्मिरी हिंदु कर्मचार्यांची सूची आतंकवादी संघटनांकडे कशी पोचली, ही दुर्लक्षित करण्यासाठी गोष्ट नाही. त्यात अनेक कार्यस्थळे आणि निवासस्थाने यांच्याविषयी माहिती होती. या सूचीचा उल्लेख करतांना ‘द रेरिस्टेंर फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने काश्मिरी हिंदूंना संपवण्याची धमकी दिली होती. जाणीवपूर्वक काश्मिरी हिंदु कर्मचार्यांची सूची उघड करण्यात आली. त्यावरून हे सहजपणे समजू शकते की, काश्मिरी हिंदूंनी तेथून निघून जावे, असे वाटणारे लोक तेथे आहेत आणि अशा लोकांचे आतंकवाद्यांशी साटेलोटे आहे.
काश्मीरमध्ये आतंकवादी हे काश्मिरी हिंदूंना निवडून निवडून लक्ष्य करत आहेत, त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण होणे स्वाभाविक आहे. यासाठीच तर आतंकवादी त्यांना लक्ष्य करत आहेत. आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांना जोपर्यंत वाटते की, त्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केल्याने ते काश्मीर सोडून जातील, तोपर्यंत त्यांच्याकडून त्यांना लक्ष्य करणे चालू राहील. ही गोष्ट सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांनीही समजून घेतली पाहिजे. काश्मीरची परिस्थिती सामान्य होण्याच्या दाव्यांना तोपर्यंत मान्यता मिळू नये, जोपर्यंत तेथून जीव वाचवून पळालेले काश्मिरी हिंदू त्यांच्या घरांमध्ये सुखरूप परतत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये वसवणे सोपे नाही; कारण त्यासाठी तेथील परिस्थिती अनुकूल नाही. जोपर्यंत काश्मिरी हिंदू त्यांच्या घरी परतत नाहीत, तोपर्यंत या निर्णयापर्यंत पोचता येत नाही की, ‘तेथे निवडणूक घेतल्या, तर सर्वकाही सुरळीत होईल.’ त्यामुळे निवडणुका घेण्यापूर्वी काश्मिरी हिंदूंची ‘घरवापसी’ सुनिश्चित करण्यात आली पाहिजे.
४. …असा संदेश भारत सरकारने देणे आवश्यक !
सध्याच्या परिस्थितीत हे सोपे काम नाही. त्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील, जशी इस्रायलने यहुदींना वसवण्यासाठी उचललेली होती. सरकारने काश्मिरी हिंदूंना वसवण्यासाठी विशेष वसाहती बनवण्याची ही योग्य वेळ आहे. जोपर्यंत परिस्थिती सुरळीत होत नाही, तोपर्यंत या वसाहतींमध्ये माजी सैनिकांना रहाण्यास सांगावे. पूर्वी काश्मिरी हिंदूंसाठी विशेष वसाहती बनवण्याचे सूत्र उपस्थित झाले होते, तेव्हा सर्वांनी त्याला विरोध केला होता. ‘काश्मिरी हिंदूंना परत यायचे असेल, तर त्यांनी पूर्वीसारखे सर्वांमध्ये रहावे’, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामागे काश्मिरी हिंदूंच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे, हाच उद्देश होता. ‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंना वसवल्याविना स्वस्थ बसणार नाही’, असा संदेश भारत सरकारने देणे आवश्यक आहे. या माध्यमातून काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केल्याने आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांचा उद्देश यशस्वी होणे शक्य नाही, असा संदेश देता येईल.’
– राजीव सचान, सहयोगी संपादक, दैनिक जागरण