रस्‍ता खोदतांना जलवाहिनी फोडणार्‍या ठेकेदाराला ८ लाख रुपयांचा दंड !

  • वाशी येथील घटना

  • साडे तीन मासांनंतर दंड भरला

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) – वाशी येथे रस्‍ता खोदतांना ५०० मी.मी. व्‍यासाची जलवाहिनी फोडणार्‍या ठेकेदारावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली होती. साडे तीन मासांनंतर ठेकेदाराने ८ लाख २८ सहस्र रुपये एवढी दंडाची रक्‍कम भरली आहे. ‘मे. दिनेश इंजिनिअर्स लि.’ असे कारवाई झालेल्‍या ठेकेदार आस्‍थापनाचे नाव आहे, अशी माहिती उपायुक्‍त सोमनाथ पोटरे यांनी दिली.

जलवाहिनी फुटल्‍याने स्‍थानिक भागातील पाणीपुरवठा २ दिवस खंडित झाल्‍याने रहिवाशांचे पुष्‍कळ हाल झाले. नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. नागरिकांच्‍या या रोषाला सामोरे जात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला होता. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला त्‍वरित जलवाहिनीच्‍या दुरुस्‍तीचे आदेश देऊनही त्‍याच्‍याकडून चालढकलपणा करण्‍यात आला. त्‍यामुळे शहर अभियंता विभागाने अन्‍य ठेकेदाराकडून हे काम करवून घेतले. त्‍यानंतर ठेकेदाराला दंड आकारण्‍यात आला. प्रारंभी ठेकेदाराने दंड भरण्‍यास नकार दिल्‍याने प्रशासनाने त्‍याच्‍या रस्‍ता खोदकाम करण्‍याच्‍या अन्‍य अनुमती थांबवल्‍या. त्‍यानंतर ठेकेदाराने हा दंड भरला.