साधकांनो, प्रतिमा जपणे या अहंच्या पैलूमुळे स्वतःच्या चुका लपवून भगवंताच्या चरणांपासून दूर जाण्यापेक्षा प्रामाणिकपणे चुका स्वीकारून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करा !

     श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

साधनेत जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साधकांमध्ये प्रामाणिकपणा हा मूलभूत गुण असणे अपरिहार्य आहे. काही साधकांकडून स्वत:च्या चुका उत्तरदायी साधक, तसेच सहसाधक यांच्यापासून लपवणे अथवा त्या सारवासारव करून सांगणे, त्यांच्याशी खोटे बोलणे; जे प्रयत्न झाले, त्या संदर्भात त्यांना सांगणे; परंतु जे प्रयत्न झालेले नाहीत, त्यांचा उल्लेखही न करणे इत्यादी अयोग्य कृती स्वत:च्या प्रतिमेला तडा जाऊ नये; म्हणून वेळ निभावण्यासाठी केल्या जातात. अशा अप्रामाणिकपणाच्या कृतींमुळेे साधनेत वेगाने घसरण होऊन अधोगती होते.

ईश्‍वराचे आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष असते. जो पापी स्वत:चे पाप सार्‍या विश्‍वाला ओरडून सांगतो, तोच महात्मा होण्याच्या पात्रतेचा असतो, हा दृष्टीकोन ठेवून साधकांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. अप्रामाणिकपणाच्या चुका झाल्यास साधकांनी प्रतिमा जपणे या अहंच्या पैलूवर मात करून स्वतःच्या चुका सहसाधक, तसेच उत्तरदायी साधक यांना प्रांजळपणे सांगून क्षमायाचना करावी. आपल्याकडून झालेल्या चुकांच्या संदर्भात वेळोवेळी प्रायश्‍चित्त घेणे, पालट न झाल्यास शिक्षापद्धत अवलंबणे इत्यादी प्रयत्न केल्यास त्याचे पापक्षालन होईल. स्वतःच्या चुका मांडण्यास ताण येत असेल, तर साधकांनी प्रसंगाचा सराव करणे, चूक फलकावर लिहून नंतर बैठकीत मांडणे, स्वयंसूचना सत्र करणे, असे प्रयत्न करावेत.

साधकांनो, प्रामाणिकपणा हा गुण, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गातील प्रथम पायरी आहे, हे लक्षात घेऊन तो गुण अंगी आणण्यासाठी प्रयत्न करा !

– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२३)