मुंबई – ६ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. अवघ्या ६ महिन्यांत १ लाख १३ सहस्र २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही. वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के परकीय गुंतवणूक अवघ्या ६ महिन्यांत झाली आहे’, असेही ते म्हणाले. ६ महिन्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
त्यांनी सांगितले, ‘‘आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफ्.डी.आय.) आकर्षित करण्यात पुढे आहे. गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली, तर १ लाख १९ सहस्र ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही केवळ ६ महिन्यांत महाराष्ट्रात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रीमंडळाच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्राची घौडदौड अशीच कायम राहील, असे आश्वासन देतो.’’
६ महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत कर्नाटक दुसर्या, गुजरात तिसर्या, देहली चौथ्या आणि तमिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.