छत्रपती संभाजीनगर येथे ७५ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या पोलीस उपनिरीक्षकास अटक !

एसीबी पथकाला सापडले ९ लाख रुपये आणि २५ तोळे सोने !

प्रातिनिधिक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – जालना येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे (वय ३५ वर्षे) यांनी तक्रारदाराला गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराकडून ७५ सहस्र रुपये घेत असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आपल्या मागावर असल्याचा संशय आल्याने त्यांनी लाचेसह त्यांच्या वाहनातून पळ काढला; मात्र एसीबीच्या पथकाने ३ किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले. विशेष म्हणजे पळत असतांना शिंदे यांनी ७५ सहस्र रुपयांची रक्कम फेकून दिली; मात्र वाहनात १-२ नव्हे चक्क ९ लाख ४१ सहस्र रुपये आणि अनुमाने २५ तोळे सोनेही सापडले.

लाचेच्या प्रकरणी शिंदे यांच्यावर जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात १२ एप्रिल या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात १ गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे.

संपादकीय भूमिका 

  • भ्रष्टाचाराने पोखरलेले पोलीसदल !
  • पोलीसदलातील असे भ्रष्ट पोलीस अधिकारी असल्यानंतर भ्रष्टाचाराची कीड कधीतरी संपेल का ? अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांमुळे पोलीसदलाची समाजात नाचक्की होत असून यामुळे समाजाचा पोलिसांवरील विश्वास अल्प होत आहे. अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे.