स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा

पुणे – इंग्लंडमध्ये सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट केला आहे. यापूर्वीच राहुल गांधी यांना एका प्रकरणात २ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांना खासदारकीही गमवावी लागली आहे.

काय आहे प्रकरण ?    

राहुल गांधी गेल्या मासात इंग्लंडला गेले होते. तेथे त्यांनी एका सभेत भाषण केले होते. त्यात ते म्हणाले, ‘‘सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘ते त्यांच्या ५-६ मित्रांसह एका मुसलमान माणसाला मारत होते. त्यातून वीर सावरकरांना आनंद झाला.’ एका माणसाला ५-६ माणसांनी मारले. सावरकरांची ही विचारधारा होती.’’

याच वक्तव्याचा संदर्भ देऊन सात्यकी सावरकर यांनी फौजदारी तक्रार प्रविष्ट केली आहे. माझे आजोबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे सावरकरांची अपकीर्ती झाली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधींच्या विरोधात हा दावा प्रविष्ट केला आहे, असे ट्वीट सात्यकी सावरकर यांनी केले आहे. तसेच राहुल गांधी यांनी सांगितलेला किस्सा काल्पनिक असल्याचेही सात्यकी यांनी नमूद केले आहे.