कळंगुट परिसरातील दलालांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ? – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा

पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी, ११ एप्रिल (वार्ता.) – कळंगुट परिसरात दलाल कार्यरत असल्याचे मी गत वर्षापासून सातत्याने सांगत आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनीही नुकतेच कळंगुट परिसरातील दलालांविषयी भाष्य केले आहे. कळंगुट परिसरातील दलालांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ? असा प्रश्न पुन्हा उद्भवतो, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केला आहे.

(सौजन्य : Goan varta live)

‘कळंगुट परिसरात दलाल खोटी आश्वासने देऊन पर्यटकांना लुटत आहेत आणि यामुळे कळंगुटचे नाव अपकीर्त होत आहे’, असे आरोप लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहेत. याविषयी अनेक वेळा तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. पोलीस आणि प्रशासन यांनी अशा दलालांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आहे. परराज्यांतील काही गट दलालांचे रॅकेट चालवत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

दलालांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. पोलिसांना दलालांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे अधिकार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवश्यक आदेश देण्यासाठी मी प्रयत्न करीन. दलालांवर कारवाई झाल्यासच वेश्याव्यवसाय आदी अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. दलालांमुळे परिसराचे नाव अपकीर्त होण्याबरोबरच स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे, असे खंवटे म्हणाले.

संपादकीय भूमिका

असे पर्यटनमंत्र्यांना विचारावे लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद !