‘तृणमूल काँग्रेस’लाही सोडचिठ्ठी देणार !
पणजी, ११ एप्रिल (वार्ता.) – तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी ११ एप्रिल या दिवशी खासदारकीचे त्यागपत्र राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांच्याकडे सुपुर्द केले. लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये बंगालमधून राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. त्यांचा खासदारकीचा अजून ३ वर्षे ७ मास कालावधी शिल्लक राहिला होता.
Setback For #MamataBanerjee: Ex-Goa CM Luizinho Faleiro Resigns from #TMC, #RajyaSabhahttps://t.co/S15VFGQl4j
— ABP LIVE (@abplive) April 11, 2023
याविषयी लुईझिन फालेरो म्हणाले, ‘‘खासदारकीचे त्यागपत्र मी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनाही पाठवले आहे आणि मी लवकरच पक्षही सोडणार आहे. मला बंगालचा प्रतिनिधी या नात्याने खासदारपद प्राप्त झाल्याने मला गोव्याचे प्रश्न मांडण्यास आणि खासदार निधीचा गोव्यासाठी वापर करण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मी खासदार पदाचे त्यागपत्र दिले आहे.’’
गत विधानसभा निवडणुकीत तृणमूलने फालेरो यांना फातोर्डा मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली होती, ती लुईझिन यांनी नाकारली होती आणि तेव्हापासून त्यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी असलेले राजकीय संबंध बिनसले होते. गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. यामुळेही ममता बॅनर्जी लुईझिन त्यांच्यावर नाराज होत्या. लुईझिन फालेरो यांनी ‘आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का ?’, या प्रश्नावर ‘मला आताच भाष्य करायचे नाही’, असे सांगितले.