श्रीरामनवमीच्या उत्सवांमध्ये धर्मांधांचे पूर्वनियोजित विघ्न !

छत्रपती संभाजीनगर दंगलीत जाळलेले पोलिसांचे वाहन

१. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वरात्री धर्मांधांकडून श्रीराम मंदिर परिसरात दगडफेक आणि जाळपोळ !

‘श्रीरामनवमीनिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा येथील श्रीराम मंदिरात काही हिंदु बांधव श्रीराम जन्मोत्सवाची सिद्धता करतांना श्रीरामाचा उद्घोष करत होते. तेव्हा धर्मांधांचे काही गट मोठ्या आवाजात ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत त्यांच्या जवळून गेले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यात पोलिसांना थोडासा हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे हा वाद संपल्याचे सकृतदर्शनी वाटले. त्यानंतर रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या कालावधीत, म्हणजे रामनवमीच्या पहाटे ५०० हून अधिक धर्मांध दंगलखोरांनी राममंदिर परिसरात दगडफेक केली, तसेच पेट्रोल बाँब फेकले. त्यांनी स्वागतासाठी उभारलेली मंदिराची कमान जाळली. त्या वेळी मंदिराच्या रक्षणासाठी केवळ २० पोलीस कर्मचारी तैनात होते. त्यांनी दंगलखोरांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही. या मंदिराला ३ दारे आहेत. त्यापैकी २ दारे पोलिसांनी आत जाऊन बंद केली. तेव्हा धर्मांधांचा जमाव मिळेल, त्या मार्गाने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी प्रचंड दगडफेक केली, काचा फेकून मारल्या आणि पेट्रोल बाँब फेकले. अशाही परिस्थितीत ३ पोलीस अधिकार्‍यांसह १७ पोलिसांनी धर्मांध दंगलखोरांना थोपवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांनी नवीन कुमक मागवली, तोपर्यंत धर्मांधांनी पोलिसांची वाहने, शासकीय वाहने आणि हिंदूंची वाहने यांना लक्ष्य केले होते. त्यांच्या हैदोसात २० गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. पोलिसांच्या मते मध्यरात्री दंगल चालू झाल्याचा निरोप मिळाल्यावर त्यांनी त्वरित पोलिसांची नवीन कुमक मागवली होती; परंतु धर्मांधांनी सर्व रस्ते अडवून पोलिसांना घटनास्थळी येण्यापासून थांबवले होते.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. भीषण दंगल होऊनही प्रशासनाकडून सर्व सुरळीत असल्याचे दाखवण्याचा खटाटोप !

आजपर्यंतच्या दंगलींचा इतिहास पाहिला, तर प्रत्येक वेळी हिंदु सणांच्या मुहूर्तावर धर्मांध दंगली करून हिंदूंची प्रचंड हानी करतात. संभाजीनगर येथे या धर्मांध दंगलखोरांनी त्यांचे तोंडवळे संपूर्णपणे झाकले होते. त्यामुळे पोलिसांनी काही ज्ञात आणि अज्ञात ५०० हून अधिक व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदवले. एकाच वेळी इतक्या प्रमाणात धर्मांध एकत्र कसे आले ? आणि त्यांनी एक ट्रॅक्टर भरेल एवढे दगडधोंडे आणि बाटल्या कुठून आणल्या ? या सर्व दगडधोंडे आणि बाटल्या दुसर्‍या दिवशी प्रशासनाने उचलल्या. तसेच जाळलेली २० वाहने हलवली. यातून सर्वकाही व्यवस्थित आहे आणि जे झाले ते किरकोळ आहे, हे दाखवण्याचा प्रशासनाने खटाटोप केला. जो प्रत्येक वेळी करून धर्मांधांना पाठीशी घातले जाते. ‘त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर दगड, विटा आणि पेट्रोलबाँब कुठून मिळतात? तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात ते एकत्रित कसे येतात ?’, हा प्रश्न प्रत्येक दंगलीत उपस्थित केला जातो. त्यावर २-४ दिवस चर्वितचर्वण होते. त्यानंतर मात्र सोयीस्कररित्या शासनकर्ते आणि पोलीस हा विषय विसरून जातात. वास्तविक पोलिसांकडे गुप्तवार्ता खाते आहे. सरकारचा गुप्तचर विभाग असतो. त्यांना समजत नाही का की, औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण झाल्यानंतर आणि हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर संघटन झाल्यानंतर धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे एक दिवस त्यांच्याकडून दुष्कृत्य होण्याची शक्यता आहे. त्यांना याचा सुगावा का लागत नाही ? सर्व दंगलींच्या संदर्भात अशीच स्थिती असते. धर्मांध दंगली करतात आणि प्रशासन किंवा शासनकर्ते हा विषय तात्पुरता हाताळतात. घटनेच्या मुळाशी न जाता तो विषय सोडून दिला जातो. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या धर्मांधांना अटक केली जाते. तसेच सर्वधर्मसमभाव दाखवण्यासाठी त्यांच्यासमवेत काही हिंदूंनाही अटक केली जाते. पोलिसांना एवढी मारहाण होऊनही ते मुसलमानांनी हतनूर / अंधारी (सिल्लोड) येथे आयोजित केलेल्या इफ्तार मेजवानीत सहभागी झाले. असे स्वाभिमानशून्य आणि स्वत्व हरवलेले पोलीस कसे काय सहभागी होऊ शकतात ?

३. शूर आणि धाडसी पोलिसांमुळे धर्मांधांकडून श्रीराम मंदिराचे रक्षण होणे

अनेक दंगलींमध्ये पोलिसांवर आक्रमणे होत असतात. ते स्वाभिमानी पोलीस कसे काय सहन करतात ? हे आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे. वर्ष २०१८ मध्ये धर्मांधांनी संभाजीनगरमध्ये अशाच प्रकारची एक दंगल घडवून आणली होती. ज्यात धर्मांध दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या कोळेकर या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यावर प्राणघातक आक्रमण झाले होते. या आक्रमणात ते जगतील कि मरतील ? अशी त्यांची स्थिती झाली होती. उपचारासाठी त्यांना विमानाने मुंबईत हलवण्यात आले. त्यांचे दैव बलवत्तर होते; म्हणून ते वाचले. यावर्षी श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीतही या २० पोलिसांचीही हीच स्थिती झाली असती; मात्र त्यांनी धाडस आणि समयसूचकता दाखवत धर्मांधांपासून मंदिराचा होणारा विध्वंस वाचवला.

४. ‘एम्.आय.एम्’ पक्षाचे धर्मांध खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून मंदिर वाचवल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न !

धर्मांध दंगलखोर किती कावेबाज असतात, हे आतापर्यंत प्रत्येक वेळी दिसलेलेच आहे. धर्मांधांचा एक मोठा गट हिंसाचार करून हिंदूंसह पोलिसांना लक्ष्य करतो. ते ३-४ घंटे कायदा-सुव्यवस्था मोडून धुडगूस घालतात. दुसर्‍या दिवशी त्यांच्यातीलच काही धर्मांध सरबत वाटायला मोकळे असतात. तसेच ‘झाले ते चूकच आहे’, ‘हिंसाचार करणार्‍यांना धर्म नसतो’, अशी मखलाशी चालू ठेवतात. यानिमित्त ‘एम्.आय.एम्’ पक्षाचे धर्मांध खासदार जलील यांची नौटंकी तर वेगळीच ! ‘त्यांनी मंदिर वाचवले आणि धर्मांध दंगलखोरांना मंदिरात घुसू दिले नाही’, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तसी स्वतःची छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यांनी सर्वकाही कसे सुरळीत आहे, हे भासवण्यासाठी मंदिरातील पुजार्‍यांना सामाजिक माध्यमांसमोर आणले. त्यांच्या माध्यमातून वदवून घेतले की, ‘ते सुरक्षित होते आणि त्यांच्यावर आक्रमण झाले नाही.’ मग प्रश्न असा उपस्थित होतो की, ट्रॅक्टर भरून दगड आणि काचा रस्त्यावर कशा आल्या ? पोलिसांची १७ आणि हिंदूंची अनेक वाहने कुणी जाळली ? यांची उत्तरे कोण देणार ? यातून हिंदु किती नेभळट असतात, हेही लक्षात येते. मशिदीतील एखादा मुल्ला-मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) कधी आपल्या पुरोहितांसारखा बोलला असता का? त्याने किती कांगावा केला असता ?

५. धर्मांधांकडून संभाजीनगरची दंगल पूर्वनियोजित !

दंगलीच्या वेळी धर्मांधांनी तेथे पोलिसांना ३ घंटे पोचू दिले नाही. यातून पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते यांनी बोध घेतला पाहिजे. अन्यथा हिंदूंसाठी येणारा प्रत्येक दिवसच नव्हे, तर प्रत्येक क्षण धोकादायक आहे. त्यांना प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून सर्व पायाभूत सुविधा असतात; पण त्या भागात हिंदूंना प्रवेश नाकारला जातो. आता तर पोलिसांनाही येऊ दिले जात नाही, हे छत्रपती संभाजीनगरचे ताजे उदाहरण आहे. यासंदर्भात पोलीस आणि प्रशासन यांनी तातडीने विचार नव्हे, तर कृती केली पाहिजे. दंगलखोरांनी पुरावा शेष राहू नये; म्हणून तेथील ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रकही फोडले. त्यामुळे कावेबाज धर्मांध त्यांच्या षड्यंत्रात यशस्वी झाले, असे खेदाने म्हणावे लागते. धर्मांध प्रत्येक वेळी पूर्वनियोजित पद्धतीने दंगली करतात. पोलीस मोजक्या लोकांना अटक करण्यापलीकडे नवीन काही करत नाहीत.

६. माध्यमांनी दंगलीची वास्तवता न दाखवणे, हे दंगलखोरांना पाठिंबा दर्शवण्यासारखेच !

यासमवेतच काही निर्लज्ज हिंदू ‘ही दंगल शासनकर्त्यांनी, म्हणजे शिवसेना आणि भाजप यांनी घडवून आणली’, असे म्हणायलाही मागे पहात नाहीत. आपले काही निर्लज्ज राजकीय पक्ष हिंदू अडचणीत येतील किंवा धर्मांधांचा उद्दामपणा अधिक वाढेल, अशा पद्धतीचे वक्तव्ये करत असतात. वर्तमानपत्रे आणि सामाजिक माध्यमे यांमध्ये आलेल्या बातम्या मन व्यथित करणार्‍या आहेत, इतके सौम्य वर्णन त्यात दिले आहे. त्या धर्मांधांचे क्रौर्य कधीच दाखवले जात नाही. या सर्व गोष्टी दंगलखोर आणि देशद्रोही यांच्या पथ्यावर पडतात. धर्मांधांनी अशाच प्रकारची दंगल जळगावमधील पाळधी या गावात घडवली. राज्यात भाजप-शिवसेनेचे आणि केंद्रात गेली ९ वर्षे हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अशा दंगली होणे, यासारखे दुसरे दुर्भाग्य नाही.

७. श्रीरामनवमीच्या दिवशी गुजरात, बिहार, झारखंड आणि बंगाल येथेही धर्मांधांचा धुडगूस !

रामनवमीला केवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मांधांनी दंगल घडवली, असे नाही, तर त्यांनी गुजरातमधील वडोदरा या शहरातही रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. या दिवशी त्यांनी बंगालच्या हावडा शहरातही मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला. बिहारमध्ये ५ दिवस मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. झारखंडमधील साहिबगंज येथेही धर्मांध दंगलखोरांनी हिंदुविरोधी मनोवृत्तीचे प्रदर्शन केले. यात पोलीसही घायाळ झाले. बिहारच्या सासाराम येथे ६ धर्मांध बाँब बनवत असतांना झालेल्या स्फोटात घायाळ झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दौरा रहित करावा लागला. नालंदा शहरातही हिंसाचार झाला. तेथील गोळीबारात एक जण ठार झाला.

८. हिंदू जागृत होऊन संघटित होणार कि मुर्दाडाप्रमाणे ७५ वर्षे मारच खात रहाणार ?

नेहमीप्रमाणेच या वेळीही धर्मांध दंगलखोरांनी केलेला हिंसाचार आणि नासधूस यांविषयी कुणीही काही बोलत नाही, ना कुणी बातम्या देतो. याउलट प्रतिबंधित मुसलमान संघटनेचे कार्यकर्ते ‘निरपराध लोकांचा मृत्यू झाला’, असे सांगून पत्रकार परिषदा आणि मोर्चे आयोजित करून गळे काढायला लागले. जोपर्यंत मृतवत् हिंदू संघटित होऊन राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून वैध मार्गाने प्रतिकार करत नाहीत आणि धर्मांधांशी व्यवहार चालूच ठेवतील, तोपर्यंत हिंदू मारच खात रहातील अन् हे गेली ७५ वर्षे चालू आहे. आजही संपूर्ण भारतभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धर्मांधांची गुंडगिरी आणि आतंकवादी कृत्ये चालू असतांना हिंदू धर्मांधांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. मग दुसरे काय होणार ? मागील वर्षीही रामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या उत्सवांच्या वेळी मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या होत्या. हिंदूसंघटनाच्या अभावी हे होत आहे, हे हिंदूंना समजेल, तो सुदिन !’

श्रीकृष्णार्पणमस्तु !

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (४.४.२०२३)

संपादकीय भूमिका : श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी हैदोस घालायला हा देश पाकिस्तान आहे का ?