पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावते ! – रशियाच्या माजी सुरक्षारक्षकाचा खुलासा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावत आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते इतरांना ज्ञात नसलेल्या रेल्वेगाडीने प्रवास करतात. रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे माजी सुरक्षारक्षक ग्लीब काराकुलोव्ह यांनी पुतिन यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या सर्व उपायांची माहिती दिली.

ग्लीब काराकुलोव्ह म्हणाले की, रशियन राष्ट्राध्यक्षांची वेगवेगळ्या शहरांमध्ये एकसारखीच कार्यालये आहेत. पुतिन त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या खाजगी निवासस्थानांमध्ये घालवतात, ज्यांना ‘बंकर’ असे संबोधले जाते. ते लोकांपासून दूर रहातात. ते अत्यंत आत्मकेंद्रित नेते आहेत आणि त्यांना स्वत:ची फार काळजी असते. ग्लीब यांनी सांगितले की, त्यांनी रशियन नेत्यांसोबत १८० हून अधिक वेळा प्रवास केला आहे. पुतिन यांना तंत्रज्ञानात रस नाही. ते दूरध्वनी किंवा इंटरनेट वापरत नाहीत. कुठलीही माहिती मिळवण्यासाठी ते जवळच्या लोकांचे साहाय्य घेतात.