पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

स्वातंत्र्यवीर सावरकर, पू. गोळवलकर गुरुजी, आणि डॉ. केशव हेडगेवार

नवी मुंबई, ५ एप्रिल (वार्ता.) – सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ते ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसारित केल्याप्रकरणी एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पुढील चौकशी चालू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली. या प्रकरणात सुनील सुखदेव आणि त्याचे साथीदार हे आरोपी आहेत.

तक्रारदार महेंद्र कुमठेकर यांना ‘व्हॉट्सॲप’च्या एका गटात सुखदेव यांनी पोस्ट केलेले वरील तिघांविषयीचे आक्षेपार्ह लिखाण वाचनात आले. त्यात ‘पू. गोळवलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महंमद अली जीना, केशव हेडगेवार यांचे आपसांतील नाते काय ?’, तसेच त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. ही सर्व माहिती गोळवलकरगुरुजी, रज्जू भैया आणि बाळकृष्ण मुंजे यांच्या चरित्रातून घेण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. प्रश्नोत्तरे संपल्यावर लिखाणामध्ये ‘हिंदू एकत्र आल्याचे यांना पहावत नाही’, असेही नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !