सातारा – सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या फलटण तालुक्यातील श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेमध्ये मुंगी घाटातून कावड वर नेत असतांना १३ भाविक दरीत कोसळून घायाळ झाले. ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या साहाय्याने सर्व भाविकांना वर काढण्यात आले असून वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
महाराष्ट्र संपूर्ण देशातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्त कावड घेऊन महादेवाला अभिषेक करण्यासाठी मुंगी घाटातून वर चढून येतात. सासवड पंचक्रोशीतील अशीच एक कावड महादेवाला अभिषेक करण्यासाठी भाविक घेऊन चालले होते; मात्र गड चढतांना १३ भाविक कावडीसह दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्यांनी तात्काळ साहाय्यता अभियान राबवत सर्व शिवभक्तांना दरीतून वर काढले आणि फलटण येथील रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी भरती केले.