पुणे – राज्यातील कला महाविद्यालय महाराष्ट्र संघाच्या वतीने उच्च कला अभ्यासक्रम, अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या विनाअनुदानित चित्रकला संस्था, प्रवेश प्रक्रिया अशा विषयांशी निगडित विविध मागण्या सातत्याने करण्यात येत आहेत; मात्र त्यावर अद्यापही योग्य निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे संघाने ‘उच्च कला परीक्षा २०२३’वर बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष भरत बोराटे, सचिव संजय सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बोराटे म्हणाले की, राज्यातील उच्च कला अभ्यासक्रमास शासनाने अद्यापही मान्यता दिलेली नाही, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी ‘ऑनलाईन’ परीक्षा चालू असतांनाही सरकारी पातळीवर परीक्षा घेण्यात येत आहेत. वर्ष १९९३ पासून एकही महाविद्यालय अनुदानास प्राप्त झालेले नाही. शिक्षण शुल्कामध्येही वाढ नाही. अनेक विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही. अशा अनेक समस्यांवर सरकार काहीही उपाय काढत नसल्याने बहिष्कार टाकावा लागत आहे.