४० वर्षांतील विक्रमी वसुली
पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षातील मिळकतकरापोटी ८१० कोटी रुपये ३१ मार्च २०२३ पर्यंत जमा झाले. ही रक्कम गेल्या ४० वर्षांतील विक्रमी मिळकतकर आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ६२८ कोटी रुपये होती. शहरातील ५ लाख ९७ सहस्र ५८७ मिळकत धारकांपैकी ४ लाख २५ सहस्र मिळकत धारकांची ही रक्कम असल्याचे समजते.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मिळकतकर आहे. त्यामुळे मिळकतकर आकारणी आणि करसंकलन विभागाने चालू वर्षामध्ये १३ सहस्रांपेक्षा अधिक मिळकत धारकांना जप्तीची पत्रे पाठवली होती. त्यातील १० सहस्र मिळकत धारकांनी रक्कम जमा केली आहे, तर २ सहस्रांपेक्षा अधिक मिळकती जप्त केल्या आहेत.
राज्य सरकारने ३ मार्च या दिवशी अवैध बांधकामांचा सरसकट शास्ती (दंड) माफ केला. त्याचा ३१ सहस्र ३११ मिळकत धारकांना लाभ मिळाला. त्यातील २३ सहस्र ५०० मालमत्ता धारकांनी १७० कोटी रुपये हा मूळ कराचा भरणा केला. त्यांना २८० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ झाला आहे. शास्तीकर माफ झाल्याने अनुमाने ९० टक्के मूळ कर वसूल करण्यात आला असल्याचे समजते.