भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोलाची शक्ती देणारे आद्यस्वातंत्र्यवीर सावरकर !

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ‘सावरकर गौरव यात्रा’ चालू आहेत. त्या निमित्ताने…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्ष १९८९ मध्ये मांडलेली भूमिका !

२८ मे १९८९ या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’ने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी शरद पवार यांनी सावरकर यांच्याविषयी जे गौरवोद्गार काढले होते, ते आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

१. जातीभेद नष्ट करण्याविषयी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले कार्य

स्वातंत्र्यवीर सावरकर हे खर्‍या अर्थाने या देशातील आद्यस्वातंत्र्यवीर होते. दलितांना समवेत घेऊन सामुदायिक धोरणे आपण प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणली पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणे कृती केली आणि भक्कमपणे पावले उचलली. स्वतःच्या कुटुंबामध्ये मेहतर समाजाच्या मुलाला सेवेमध्ये सहभागी करून घेतले. ‘कुणी दलित असेल, कुणी उपेक्षित असेल, तर त्याला घराचे दरवाजे बंद ठेवणे याचा अर्थ आपण आपला समाज दुबळा करणे’, अशा प्रकारची भूमिका प्रकर्षाने मांडण्याचे काम त्या काळात सावरकर यांनी केले होते. ‘हा जातीभेद गाडला पाहिजे’, या प्रकारची स्वच्छ भूमिका त्यांनी मांडलेली होती.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्य  संग्रामामध्ये ‘सशस्त्र क्रांती’चे केलेले कार्य धाडसी  !

सावरकर यांनी स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये केलेली जी कामगिरी आहे, त्याचे इतिहासात एक वेगळे असे स्थान आहे. लोकमान्य टिळक, म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली अवघा भारत एकसंघ झाला; परंतु या दोघांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जो चाललेला जंग (लढा) होता, त्याला एक मोलाची शक्ती देण्याचे काम सावरकर यांच्या ‘सशस्त्र क्रांती’च्या विचारसरणीमधून निश्चितपणाने झाली, ही गोष्ट मान्य करावी लागेल. सावरकर यांनी वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:ला स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याची धाडसी भूमिका त्या काळामध्ये दाखवलेली होती. ‘मित्रमेळ्या’ची स्थापना असो, नंतरच्या काळात उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यानंतर त्या ठिकाणी नवी उभारलेली भारताच्या संदर्भातील संघटनेची वाढ करण्याविषयीची त्यांची भूमिका असो, उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर जवळपास ५० वर्षांची ही अतिशय कठीण अशी शिक्षा भोगण्यासंदर्भातील त्यांची कामगिरी असो, अशी प्रत्येक कामगिरी आजच्या नव्या पिढीला प्रेरणा देणारी अशी आहे. हे काम त्यांनी अत्यंत जिद्दीने, चिकाटीने आणि कष्टाने केले अन् या कष्टामुळे आणि त्यागामुळे त्यांना फार मोठ्या प्रकारची किंमत द्यावी लागली होती.

 ३. सावरकर यांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या मंदिर प्रवेशाविषयीच्या सूत्राचा पुरस्कार जाहीरपणाने केला. रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर स्थापन करून ‘आपण  दलितांना मुक्तपणाने मंदिर प्रवेश देऊ शकतो’, असे चित्र त्या परिसरामध्ये निर्माण झाले.  सावरकर यांनी परिवर्तनाची चळवळ मजबुतीने उभी केली. हिंदुत्वाच्या संदर्भातील व्यापक चित्र त्यांनी समाजाच्या समोर मांडलेले होते. ‘हिंदुत्वाचा अर्थ धर्मापुरता मर्यादित’ अशा प्रकारची भूमिका त्यांनी यत्किंचित्ही कुणापुढे मांडली नाही. ‘या भूमीशी संपूर्ण निष्ठा ठेवणारा जो कुणी भारतप्रेमी असेल, तो खर्‍या अर्थाने हिंदुत्ववादी आहे’, अशा प्रकारची एक नवीन व्याख्या त्या काळामध्ये स्वातंत्र्यविरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणार्‍यांनी कधी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे का ?

(शरद पवार यांची ही भूमिका सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणारे काँग्रेसचे राहुल गांधींसह अन्य नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, तसेच सावरकरद्वेषी आतातरी मान्य करतील का ? कि सावरकर यांना कलंकित करण्यासाठी आकांडतांडव करतील ? – संपादक)
(साभार : savarkarsmarak.com आणि फेसबुक)