श्रीरामनवमीच्‍या कालावधीत घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगांतून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

कु. म्रिणालिनी देवघरे

१. ‘प्रत्‍येकाने भावजागृतीचा प्रयोग करून घ्‍यावयाचा आहे’, असे कळल्‍यावर आरंभी आनंद वाटून नंतर नकारात्‍मक विचार येणे

‘आरंभी जेव्‍हा दायित्‍व असलेल्‍या साधिकेने सांगितले की, प्रतिदिन एकाने भावजागृतीचा प्रयोग घ्‍यायचा आहे. तेव्‍हा मला आनंद झाला. ‘आपल्‍याला देव ‘प्रत्‍येकाचा भाव कसा आहे ?’ हे शिकवणार आहे’, असे वाटले. त्‍यानंतर माझ्‍या मनात ‘मला भावजागृतीचा प्रयोग नीट घेता येईल का ? सध्‍या माझे काहीच प्रयत्न नियमित होत नाहीत. मला इतरांसारखा भावजागृतीचा प्रयोग घेता येत नाही’, असे प्रतिमेचे विचार आले.

२. इतर साधकांनी घेतलेले भावजागृतीचे प्रयोग ऐकल्‍यावर आणि देवाला प्रार्थना करून स्‍वयंसूचना घेतल्‍याने सकारात्‍मकता वाढणे

प्रतिदिन साधकांचे भावजागृतीचा प्रयोग ऐकून मनाचा उत्‍साह वाढत गेला. ‘प्रसंगांमध्‍ये सकारात्‍मक कसे रहाता येईल ?’, असा विचार होऊ लागला. देवाला प्रार्थना केल्‍यावर देवानेच सुचवले, ‘व्‍यष्‍टी साधनेच्‍या प्रयत्नांचा ध्‍यास घे, त्‍यामध्‍ये सातत्‍य ठेव.’ त्‍यानंतर मी सकारात्‍मक स्‍वयंसूचना घेण्‍यास आरंभ केला. त्‍यामुळे सकाळी उठल्‍यावर देव मला प्रयत्न करण्‍याची आठवण करून देत होता.

 ३. स्‍वतः भावजागृतीचा प्रयोग करून घेतल्‍यावर आनंद जाणवून आत्‍मविश्‍वास वाढणे 

मी भावजागृतीचा प्रयोग करून घेण्‍यापूर्वी मला उत्‍साह जाणवत होता. प्रयोग करून घेतांना मला आनंद जाणवत होता आणि घेतल्‍यानंतर मन पूर्ण हलके झाले. प्रयोगानंतर मनाला एक प्रकारे बळ मिळाले आणि ‘अजून भावजागृतीचा प्रयोग करून घेऊया’, असे वाटून माझा आत्‍मविश्‍वास वाढला.

४. चैतन्‍य, आनंद आणि शांती मिळून भावजागृती होणे

साधिकांनी घेतलेले भावजागृतीचे प्रयोग अनुभवतांना ‘भावजागृती होत आहे आणि चैतन्‍य, आनंद अन् शांतीही मिळत आहे’, असे मला जाणवले. ज्‍या वेळी भावजागृती व्‍हायची, त्‍या वेळी असे वाटायचे, ‘देव आपल्‍यासाठी किती करत आहे ? त्‍याच्‍या एका स्‍मरणानेही माझा थकवा, सगळी नकारात्‍मकता आणि निराशा जाते; पण मी प्रयत्न करायलाच न्‍यून पडते.’ प्रयोगांमुळे माझ्‍यातील जडत्‍व लगेच दूर होण्‍यास साहाय्‍य झालेे आणि माझे मन आनंदी झाले. मी नियमित भाववृद्धीच्‍या दृष्‍टीने प्रयत्न चालू केल्‍याने मला सेवा करतांना उत्‍साह जाणवतो. प्रत्‍येकाने भावप्रयोगात रामायणातील विविध प्रसंग घेतल्‍यामुळे प्रतिदिन रामाविषयी उत्‍कंठा वाढू लागली.

 ५. श्रीरामनवमीच्‍या दिवशी आलेल्‍या अनुभूती

५ अ. श्रीरामनवमीनिमित्त पूर्ण दिवसभर रामाचा जप करण्‍याचे ध्‍येय ठरवणे आणि तसे केल्‍यामुळे आनंद मिळणे : श्रीरामनवमीच्‍या दिवशी सकाळी अल्‍पाहार बनवण्‍याची सेवा माझ्‍याकडे होती. त्‍यामुळे मला लवकर उठायचे होते आणि आदल्‍या दिवशीही मी शारीरिक सेवा केली होती. श्रीरामनवमीनिमित्त मी ‘पूर्ण दिवस रामाचा जप सतत चालू ठेवायचा आणि रामाचे स्‍मरण करत रहायचे’, असे ध्‍येय ठरवले होते. त्‍यामुळे अल्‍पाहार बनवण्‍याची सेवा करतांना मनात कोणताही वेगळा विचार आला नाही. सेवा करतांना मला प्रत्‍येक क्षणी आनंद मिळत होता.

५ आ. अल्‍पाहार बनवण्‍याच्‍या सेवेच्‍या वेळी देवच सर्वकाही करवून घेत असल्‍याची जाणीव होणे : प्रत्‍येक कृती करतांना ‘देव माझ्‍या समवेत सेवा करत आहे’, असे वाटत होते. त्‍यामुळे शारीरिक धावपळ करूनही मला थकल्‍यासारखे वाटत नव्‍हते. माझी अल्‍पाहार बनवण्‍याची सेवा ३ घंटे असते. थकल्‍यामुळे मी मध्‍येच काही वेळ विश्रांतीला जाते; पण या वेळी अल्‍पाहार सेवा पूर्ण करूनही मला थकवा जाणवत नव्‍हता किंवा झोपही येत नव्‍हती. त्‍या दिवशी देवाने माझ्‍याकडून अल्‍पाहार सेवा करून रात्रीपर्यंत विभागसेवाही करवून घेतली.

५ इ. भावप्रयोगांमुळे साधनेचे प्रयत्न करण्‍यासाठी ऊर्जा आणि चैतन्‍य मिळणे : आपण सेवेच्‍या माध्‍यमातून ईश्‍वराशी जोडले गेलो, तर त्‍याचे सगळे दायित्‍व ईश्‍वरच घेतो. ‘देव आपल्‍याला एवढे देत आहे, केवळ आपण त्‍याचे मनोभावे पालन करायला हवे. आपल्‍या स्‍वभावदोषांमुळे साधनेचा वेळ वाया घालवायला नको’, असे मला शिकायला मिळाले. गुढीपाडव्‍यासाठी ठरवलेले ध्‍येय कृतीत आणण्‍यासाठी माझे प्रयत्न अल्‍प पडत होते; पण या ९ दिवसांमध्‍ये भावजागृतीच्‍या प्रयोगांमुळे मला प्रयत्नांसाठी ऊर्जा आणि चैतन्‍य मिळाल्‍यामुळे ‘देवच प्रत्‍येक प्रयत्न करून घेत आहे’, असे जाणवले.’

– कु. म्रिणालिनी देवघरे, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक