अमेरिकेतील ‘टाइम्स स्क्वेअर’ येथे खालिस्तान समर्थकांकडून मोर्चा !

भारतविरोधी, तर पाकच्या समर्थनार्थ घोषणा !

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील प्रसिद्ध ‘टाइम्स स्क्वेअर’ भागात खलिस्तानी समर्थकांनी खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याच्या अटकेच्या प्रयत्नावरून मोर्चा काढला. या वेळी पुरुषांसमवेत महिला आणि लहान मुलेही उपस्थित होती. हातात असलेले खलिस्तानचे ध्वज फडकावत भारतविरोधी घोषणांसह पाकिस्तानच्या समर्थनार्थही घोषणा दिल्या जात होत्या. या प्रसंगी न्यूयॉर्क पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

१. लंडन आणि सॅन फ्रॅन्सिस्को या शहरांमध्ये असलेल्या भारतीय दूतावासांवरील आक्रमणांमुळे न्यूयॉर्क पोलीस सतर्क झाले आहेत.

२. १८ मार्च या दिवशी पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंह याला अटक करण्यासाठी त्याला घेराव घातला होता. त्या वेळी त्याच्या समर्थकांच्या साहाय्याने तो तेथून पसार झाला. तेव्हापासून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

३. दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बगची यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत सांगितले आहे की, भारतीय दूतावासांवर होत असलेल्या आक्रमणांवर संबंधित देशांनी कठोर भूमिका अवलंबत आरोपींच्या विरोधात कारवाई करायला हवी. केवळ आश्‍वासनांनी नव्हे, तर कारवाई केल्यानेच आमचे समाधान होईल.

संपादकीय भूमिका

अशा भारतद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी भारताने अमेरिकेस भाग पाडले पाहिजे !