#Exclusive : जळमटांनी माखलेले छत, प्रवेशद्वारावर कचरा आदी अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे अमरावती बसस्थानक !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

प्रतिनिधी : श्री. दत्तात्रय फोकमारे, यवतमाळ

अमरावती, २६ मार्च (वार्ता.) – एकीकडे राज्य परिवहन मंडळाची ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ चालू आहे आणि दुसरीकडे अनेक मास बसस्थानकाच्या छताला झाडूही न लावल्यामुळे अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाचे छत जळमटांनी भरलेले आहे. प्रवेशद्वारातच कचर्‍याचा ढीग, तेथेच कचरा जाळल्याची राख, भूमीगत नाल्याचे बसस्थानकाच्या परिसरात पसरत असलेले घाणीचे पाणी आदींमुळे स्वच्छता मोहिमेचे या स्थानकावर तीनतेरा वाजले आहेत.

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत असलेला कचर्‍याचा ढीग

१. नाल्यातून बाहेर आलेल्या अस्वच्छ पाण्यातूनच प्रवाशांना चालावे लागते. अनेक दिवसांपासून ही समस्या असूनही ते पाणी बंद होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेली नाही.

बसस्थानकावर पसरलेले भूमीगत नाल्याचे पाणी

२. छताच्या काही भागाचे प्लास्टर निखळून आतील लोखंडी सळ्या दिसत आहेत. वेळीच डागडुजी केली नाही, तर छताचे प्लास्टर आणखीही निखळण्याची शक्यता आहे.

प्लास्टर निघून बसस्थानकाच्या छताच्या सळ्या दिसत आहे

३. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांच्या बाजूलाच नागरिक पान, गुटखा खाऊन थुंकतात. हे रोखण्यासाठी सूचना लावणे आणि त्यानंतरही पालट न झाल्यास दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे बसस्थानक अस्वच्छ झाले आहे. अशा दुर्गंधीत आणि अस्वच्छतेत प्रवाशांना बसची वाट पहावी लागते.

बाकड्यांच्या बाजूलाच थुंकल्याने दुर्गंधीतच प्रवाशांना बसावे लागते

४. एकूणच जळमटांचे जाळे, छताला गेलेले तडे, कचर्‍याचे ढीग, भूमीगत नालीतून बाहेर येणारे पाणी आदींमुळे अमरावती बसस्थानकाच्या अस्वच्छतेला कारणीभूत असलेल्या समस्यांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी अमरावती बसस्थानकाच्या आगार प्रमुखांकडून याविषयी कृती होणे आवश्यक आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

जळमटांचे आच्छादन पसरलेले बसस्थानकातील छत

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !

आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा.