रत्नागिरी – दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे आणि पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्व अभ्यासक सचिन जोशी यांनी दापोली तालुक्यातील पालगड गावाजवळील ‘रामगड’ या काळाच्या पडद्याआड गेलाल्या गडाला प्रकाशझोतात आणले आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि वास्तूरचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित असलेला प्राथमिक अहवाल इतिहास संशोधक मंडळामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी सादर केला आहे, असे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तसंकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड गावाच्या पूर्वेस दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर ‘रामगड’ हा लहान गड आहे. ‘रामगड’ हा पालगडाचा जोडदुर्ग असून, आजवर या गडाची स्थाननिश्चिती झाली नव्हती. आता महाराष्ट्रात रामगड नावाचे २ गड असून, यातील पहिला रामगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे, तर दुसरा रामगड आता सापडला आहे. ‘या गडाची बांधणी कोणत्या काळात झाली ?’, हे आज ज्ञात नसले, तरी पालगडासमवेतच हा गड बांधलेला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या गडाची अवकाशातून छायाचित्रे काढण्यात आली असून यामध्ये काही बांधकामांचे अवशेष दिसले आहेत. गडाच्या सर्वेक्षणात गडाचा दरवाजा, त्याचे २ संरक्षक बुरुज, तटबंदीतील ४ बुरुजांसह ६ इमारतींचे अवशेष, तसेच भांड्यांचे तुकडे मिळाले आहेत. या गडाची तटबंदी आणि दरवाजा उद्ध्वस्त झाला आहे.