संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने आयोजित सासवड (पुणे) येथील मूक पदयात्रा !
सासवड (जिल्हा पुणे) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलीदानातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी तन, मन, धनासह सर्वस्व अर्पण करण्यासाठी सिद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर विभाग आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा यांच्या वतीने २१ मार्च या दिवशी सासवड शहरात मूक पदयात्रा घेण्यात आली. या पदयात्रेच्या शेवटी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. या वेळी ३५० हून अधिक युवक आणि युवती उपस्थित होते.
सासवड येथील श्री शिवतीर्थ चौकात एकत्रितपणे प्रेरणामंत्र म्हणून पदयात्रेचा प्रारंभ झाला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी असलेला रथही सहभागी झाला होता. त्यानंतर श्री संभाजीसूर्यहृदय स्तोत्र म्हणण्यात आले. या वेळी ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’चे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. प्रमोद कारकर यांनी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास’ याविषयी, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संस्थापक श्री. पंडितदादा मोडक, तसेच गोरक्षक श्री. सूरज भगत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कराड येथील धारकरी श्री. शुभम् निंबाळकर यांनी शंभूगाथा सादर केली. त्यानंतर ध्येयमंत्र घेण्यात आला. शेवटी उपस्थित सर्व युवक आणि युवती यांनी देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध होण्याची प्रतिज्ञा घेतली.
धर्मप्रेमी युवक-युवतींचे मोठे संघटन उभे करणारे धारकरी श्री. तेजस शिवरकर !श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सासवड येथील धारकरी श्री. तेजस शिवरकर यांनी संपूर्ण बलीदान मास काळात सासवड भागातील गणपति मंडळ आणि चौकांमध्ये ‘बलीदान मास वंदना’ घेतली. यासह ‘गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या प्रवचनांचे नियोजन केले होते. हिंदु नववर्षाच्या निमित्ताने सासवडमध्ये गुढी उभारून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ प्राणाचे बलीदान केले, त्या हिंदु धर्माचा प्रसार करण्याच्या ध्येयाने मोठ्या प्रमाणात त्यांनी जनजागृती केली. श्री. तेजस शिवरकर यांनी धर्मप्रेमी तरुण मुला-मुलींचे मोठे संघटन उभे केले आहे. |