पुणे – ‘निपूण भारत’ अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ डिसेंबर ते ११ फेब्रुवारी या कालावधीत ‘गुणवत्ता वृद्धी’ कार्यक्रम राबवला. जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात १ सहस्र ९९८ शाळांची गुणवत्ता वाढ शून्य टक्के, तर २६३ शाळांची गुणवत्ता उणे झाल्याचे निदर्शनात आले. १६० शाळांनी ‘गुणवत्ता वृद्धी’ उपक्रम राबवला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शैक्षणिक ग्रामसभेच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थी यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काम करण्याचे आवाहन सरपंचांना केले आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ७१ टक्के शाळांमध्ये ५१ ते १०० टक्के गुणवत्ता वाढ झाली, तर १ सहस्र ९४१ शाळांमध्ये १ ते ५१ टक्के म्हणजेच अल्प गुणवत्ता वाढ झाली. त्यामुळे ‘गुणवत्ता वृद्धी’ कार्यक्रमात गुणवत्ता वाढ न झालेल्या, गुणवत्ता खालावलेल्या, उपक्रम न राबवलेल्या शाळांमध्ये पुन्हा गुणवत्ता वाढ कार्यक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाच्या कार्यवाहीसाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांनाही सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापकांच्या साहाय्याने शैक्षणिक ग्रामसभा आयोजित करून, शाळा केंद्रस्थानी ठेवून चर्चा करावी, तसेच ‘निपूण भारत’ अभियानांतर्गत निश्चित केलेले ध्येय, उद्दिष्ट, इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती आदी संदर्भातील फलक गावाच्या दर्शनी भागात लावावेत आणि या उपक्रमाची गाव पातळीवर जागृती करावी. गावातील युवक-युवतींचा स्वयंसेवक म्हणून शाळेतील शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही पत्रकात नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकागुणवत्ता वाढ न झालेल्या, गुणवत्ता खालावलेल्या, उपक्रम न राबवलेल्या शाळेतील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहे. |