प्रेमळ, इतरांना साहाय्य करणारी आणि साधना करण्याचे महत्त्व लक्षात आलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. देवांशी महेश घिसे (वय ९ वर्षे) !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वर्ष २०१९ मध्ये कु. देवांशी घिसे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची ५४ टक्के आध्यात्मिक पातळी आहे, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२४.३.२०२३)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देवांशी घिसे ही या पिढीतील एक आहे !

कु. देवांशी महेश घिसे

चैत्र शुक्ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवांशी घिसे हिचा ९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सौ. विजया महेश घिसे (कु. देवांशीची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. विजया घिसे

१ अ. समंजस : देवांशीला ती ३ – ४ वर्षांची असतांना एक सायकल घेतली होती. ती बरीच जुनी झाली होती. तिला ती सायकल चालवायला अडचण येत होती, तरीही तिने नवीन सायकल घेऊन देण्यासाठी हट्ट केला नाही.

१ आ. शांत स्वभाव : तिला कधी कुणी बोलले, तर ती शांत रहाते. तिला वाईट वाटले, तरीही ती उलट बोलत नाही किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. तिच्याशी कुणी अयोग्य वागले, तरीही ती ते मनात ठेवत नाही आणि थोड्या वेळाने ती स्वतःहून त्यांच्याशी बोलायला जाते.

१ इ. वाचनाची आवड : तिला दैनिक सनातन प्रभात आणि सनातनचे ग्रंथ यांचे वाचन करायला आवडते. ती शाळेचा अभ्यास आणि व्यष्टी साधना करून फावल्या वेळेत ग्रंथांचे वाचन करते.

१ ई. प्रेमभाव

१ ई १. साधकांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छापत्रे बनवून देणे : बालसाधक किंवा साधक यांच्या वाढदिवसानिमित्त ती शुभेच्छापत्रे बनवते. त्यात ती संबंधित साधकाची गुणवैशिष्ट्ये लिहिते. ती साधकांमधील गुण अचूक हेरते.

१ ई २. शाळेत मैत्रिणीला स्वतःचे पुस्तक देणे : शाळेत शिक्षक शिकवत असतांना देवांशीच्या मैत्रिणीकडे पाठ्यपुस्तक नसेल, तर देवांशी स्वतःचे पुस्तक मैत्रिणीला देते आणि स्वतः शेजारी बसलेल्या मुलीच्या पुस्तकात पहाते.

१ उ. इतरांचा विचार करणे

१ उ १. आजीला रुग्णालयात नेतांना घरी रहाणे : मध्यंतरी तिची आजी पुष्कळ रुग्णाईत होती. मला प्रतिदिन त्यांना रुग्णालयात न्यावे लागत होते. त्या वेळी देवांशीला घरी अन्य नातेवाइकांच्या समवेत ३ – ४ घंटे रहावे लागायचे. खरेतर तिला माझ्या समवेत रहाण्याची पुष्कळ सवय आहे.

१ ऊ. वडिलांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेणे : आम्ही घरी गेल्यावर देवांशी तिच्या वडिलांकडून नामजप करून घेते. ती त्यांना स्वयंसूचना बनवून देते आणि त्यांना सांगते, तुम्ही मला एक वही द्या. मी तुम्हाला चिंतनसारणी बनवून देते. (चिंतनसारणी म्हणजे दिवसभरातील व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांची नोंद केलेली वही)

२. श्री. महेश घिसे (कु. देवांशीचे वडील), पुणे

श्री. महेश घिसे

२ अ. देवांशीने जाणलेले साधना करण्याचे महत्त्व

१. देवांशी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला सुंदर पत्र लिहिते. अन्य मुलांना वाटत असते, आपले बाबा श्रीमंत असावेत; मात्र देवांशी मला लिहिलेल्या पत्रात तुम्ही संत व्हा, अशी इच्छा व्यक्त करते.

२. ती एका दायित्व असलेल्या साधकाप्रमाणे मला साधनेची विविध ध्येये देते आणि ती पूर्ण झाली का ?, अशी विचारपूसही करते.

२ आ. आध्यात्मिक स्तरावरील बोलणे

१. ती घरी आल्यावर माझ्याशी खेळते, म्हणजे दैवी सत्संगात सांगितलेली कथा आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे देवांशी मला सांगते. ती माझ्याकडून भावजागृतीचा प्रयोग करून घेते.

२. एकदा ती मला म्हणाली, बाबा, तुम्ही कार्यालयातील परिस्थिती स्वीकारा, म्हणजे देव कार्यालयातील स्थितीत पालट घडवेल.

३. सुश्री (कु.) सुप्रिया गजेंद्र टोणपे (कु. देवांशीची मावशी)

३ अ. खाण्या-पिण्याची आवड नसणे आणि समंजसपणा : देवांशीला मी घरी बनवलेले काही विशिष्ट पदार्थ विशेष आवडतात; पण ती मला तिचे आवडते पदार्थ आणण्यासाठी सांगत नाही किंवा हट्ट करत नाही. एकदा मी तिला विचारले, तू मला तुझ्या आवडीचे पदार्थ स्वतःहून आणायला का सांगत नाहीस ? तेव्हा ती मला म्हणाली, मावशी, तुझी सेवा असते आणि व्यस्तताही असते. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तू माझ्यासाठी ते पदार्थ आणतेसच.

३ आ. परिस्थिती स्वीकारणे : देवांशीची आई (सौ. विजया घिसे) रुग्णालयात भरती असतांना देवांशीही रुग्णाईत होती. तेव्हा घरी तिला एकटीला एका खोलीत झोपावे लागत असे. माझी खोली तिच्या खोलीपासून बरीच दूर होती; पण ती कधी घाबरली नाही. ती केवळ खोलीचे दरवाजे उघडे ठेवण्यास सांगत असे. एवढ्या लहान वयात ती कधीही रडली नाही. तिने मोठ्या माणसांप्रमाणे परिस्थिती स्वीकारली.

३ इ. गुरूंप्रतीचा भाव : मी देवांशीला जेव्हा विचारते, तू कुणाची ? तेव्हा ती क्षणात उत्तर देते, मी गुरुदेवांची, म्हणजे परम पूज्यांची आहे.

४. कु. देवांशीचे स्वभावदोष

भावनाशीलता आणि भीती वाटणे

५. कृतज्ञता

परम पूज्य, आश्रमातील चैतन्य आणि सात्त्विक वातावरण यांमुळे देवांशी घडत आहे. ती साधकांमधील गुण हेरून ते आत्मसात करत आहे. आपण आम्हाला या अनमोल आश्रमात रहायला दिल्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !

– सौ. विजया महेश घिसे (कु. देवांशीची आई)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २५.२.२०२३)


गुरुकृपेमुळे असाध्यही साध्य होत असते ।

देवांशी, हे जाणावे तू…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अंतःकरणात जेव्हा गुरुचरण असतात ।
तेव्हा अशक्य असे काही नसते ॥ १ ॥

सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे

पदोपदी संकटे आली, तरी थांबायचे नसते ।
सतत मात करून पुढे पुढे जायचे असते ॥ २ ॥

गुरुमाऊली सतत तुझ्या जवळ असते ।
म्हणून कधी घाबरायचे नसते ॥ ३ ॥

शूर वीरांगनेप्रमाणे लढण्यास शिकायचे असते ।
माघारी फिरणे कधी चित्तात बिंबवायचे नसते ॥ ४ ॥

गुरुकृपेमुळे असाध्यही साध्य होत असते ।
म्हणून कधी निराश व्हायचे नसते ॥ ५ ॥

प्रामाणिक प्रयत्नांची कास धरायची असते ।
रण सोडूनी कधी पळायचे नसते ॥ ६ ॥

हरणे अन् जिंकणे शून्य असते ।
जेव्हा गुरुचरणी शरणागती असते ॥ ७ ॥

परिस्थिती स्वीकारून सदैव सकारात्मक रहायचे असते ।
तेव्हाच गुरुचरणीचे आनंदी फूल बनता येत असते ॥ ८ ॥

– सुश्री (कु.) सुप्रिया गजेंद्र टोणपे (कु. देवांशीची मावशी), फोंडा, गोवा. (१.३.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.