सदस्यांच्या योग्य वर्तवणुकीसाठी नियमावली बनवणार !
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिंदे-भाजप गटाच्या वतीने २३ मार्च या दिवशी विधानभवनात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले होते. २४ मार्च या दिवशी या आंदोलनाचे सूत्र विधानसभेत उपस्थित करून विरोधी सदस्यांनी सभागृहात गदारोळ घातला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे कृत्य करणारे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांतील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. याला सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रथम २० मिनिटे, १५ मिनिटे आणि १० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी सहन केली जाणार नाही’, अशी चेतावणी दिली.
सत्ताधाऱ्यांचे राहुल गांधीच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन#Maharashtra #MaharashtraAssembly #RahulGandhi https://t.co/KpRYiD6oyx
— LoksattaLive (@LoksattaLive) March 24, 2023
सदस्यांच्या योग्य वर्तणुकीसाठी नियमावली बनवणार !
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानभवन आणि सभागृह येथे सदस्यांनी अशोभनीय वर्तन करणे चुकीचे आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी केलेले आंदोलनाचे व्हिडिओ पडताळून योग्य ती कार्यवाही केली जाईल. विधानभवनात सतत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राष्ट्रपुरुष यांच्या विरोधात आंदोलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सदस्यांनी आंदोलन करतांना कोणत्या गोष्टी पाळायला हव्यात, याविषयी नियमावली बनवून ती सदस्यांना बंधनकारक करण्यात येईल. या नियमावलीच्या विरोधात वर्तवणूक करणार्या सदस्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. ही नियमावली सिद्ध केल्यानंतर त्याची माहिती सभागृहात दिली जाईल.