२३ मार्च २०२३ या दिवशी ‘भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा बलीदानदिन’ आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
‘२३ मार्च १९३१ या दिवशी सुप्रसिद्ध क्रांतीकारक भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरु आणि सुखदेव यांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आली.
सायमन कमिशनचे सभासद असेंब्लीत (संसदेत) बसले असतांना भयाची सूचना म्हणून भगतसिंग आणि बटुकेशर दत्त या दोघांनी असेंब्लीवर एक स्फोटक बाँब टाकला. या प्रकरणी त्यांना ४ एप्रिल १९२९ या दिवशी पकडण्यात आले. पुढे लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड म्हणून झालेल्या सँडर्सच्या हत्या खटल्यांत भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना गोवण्यात आले. भगतसिंग यांनी खटल्याच्या वेळी जबाब देतांना अत्यंत तेजस्वी विचार मांडले. ते म्हणाले, ‘‘इंग्रज करू तो जुलूम प्रजा सोसते; म्हणून काही कर्झनछाप अधिकारी राष्ट्राची शकले (तुकडे) करण्यासाठी पुढे धावतात. तशा मदांध अधिकार्यांच्या कानी त्रस्त प्रजेच्या आर्त किंकाळ्या पोचूच शकत नाहीत. अशा बेगुमान अधिकार्यांचे कान आणि डोळे उघडण्यासाठी आम्हाला बाँबचे आवाज काढावे लागतात.’’
७ ऑक्टोबर १९३० या दिवशी तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ‘गांधी-आयर्विन करार’ आणि राष्ट्राची एकमुखी मागणी यांचा काही एक उपयोग न होता या तिघांना २३ मार्च या दिवशी फाशी देण्यात येऊन त्यांची प्रेते आप्तांना न कळवता नष्ट करण्यात आली. या तीनही हुतात्म्यांचा शौर्यमहिमा कराचीच्या राष्ट्रसभेत गाण्यात आला.
‘‘या तरुणांचे आपण धन्यवाद गातो. याचे कारण अत्यंत निर्भयता आणि स्वार्थ त्याग यांची परमावधी त्यांच्या ठिकाणी झाली होती. ज्या वेळी इंग्लंड आपल्याशी समेटाची भाषा बोलू लागेल, त्या वेळी त्यांच्या आणि आमच्यामध्ये हुतात्मा भगतसिंग यांचे प्रेत असेल. ही गोष्ट आपण यापुढे विसरता कामा नये. हिंदुस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी आणखी किती भगतसिंगांचे मृत्यू होतील, हे कुणी सांगावे ?; परंतु आपण देशासाठी मर्दपणे आणि निर्भयवृत्तीने मरण्यास सज्ज राहिले पाहिजे, एवढाच धडा भगतसिंगांपासून आपण घ्यावयास पाहिजे’’, असे उद़्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या वेळी काढले होते.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))