खलिस्तानी अवतार सिंह खांडा याला अटक !

लंडनमध्ये उतरवला होता भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंगा

खलिस्तानी अवतार सिंह खांडा (उजवीकडे)

अमृतसर (पंजाब) – लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावरील राष्ट्रध्वज उतरवून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी लंडन पोलिसांनी खलिस्तानी अवतार सिंह खांडा याला अटक केली. खांडा हा बंदी घालण्यात आलेल्या ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या  खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे. यासह तो ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’शी संबंधित असलेला कुवंत सिंह खुराणा याचा मुलगा आहे. खांडा हा पाकिस्तानात लपलेला ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’चा प्रमुख सदस्य परमजीत सिंह पम्मा याचा जवळचा मित्र आहे. पम्माच्या आदेशानुसारच अवतार सिंह कारवाया करतो.

पम्माच्या सांगण्यावरून खांडा याने अमृतपाल सिंह याला पंजाबमधील खलिस्तान चळवळीसाठी सिद्ध केले. यानंतर जॉर्जियामध्ये अमृतपाल सिंह याला प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचाही पाठिंबा मिळाला. अमृतपालने येथे शीख धर्मातील आवश्यक गोष्टी शिकून घेतल्या. श्री गुरु ग्रंथ साहिबविषयी ज्ञान मिळवले, जेणेकरून तो इतरांसमोर स्वतःला धार्मिक गुरुसारखा भासवू शकेल.