‘२२.३.२०२३ या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मांडनिर्मितीचा दिवस ! ऋषींनी ‘कल्प, मन्वंतर, युग, संवत्सर, ऋतू, मास, पक्ष, वार, तिथी, मुहूर्त, घटिका, विघटी, परमाणू’, अशी ब्रह्मांडाची कालगणना सांगितली आहे. गुढीपाडव्याला ‘शुभकृत्’ संवत्सर पूर्ण होऊन ‘शोभन’ संवत्सराला आरंभ होणार आहे. शुभकृत् संवत्सरात (२.४.२०२२ ते २१.३.२०२३ या कालावधीत ) साधकांना कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्यांना तोंड द्यावे लागले. ‘आता आरंभ होणार्या शोभन संवत्सरात गुरुभक्ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो ?’, हे आपण पाहूया.
१. ‘शुभकृत्’ संवत्सरात अनेक साधकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक समस्यांना सामोरे जावे लागणे
‘काळगतीपुढे बुद्धी काय करी ?’, असे प.पू. भक्तराज महाराजांचे एक भजन आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव ‘शुभकृत्’ संवत्सरात अनेक साधकांनी घेतला. ‘गुरुदेव साक्षात् श्रीमन्नारायण आहेत’, हे ठाऊक असूनही शुभकृत् संवत्सरात अनेक साधकांचा मायेकडील कल वाढला. ‘शुभकृत् संवत्सर हा साधकांसाठी परीक्षेचा ‘काळ’ होता’, असेच म्हणता येईल. काही साधकांच्या कौटुंबिक समस्या वाढल्याने त्यांना पूर्णवेळ सेवा सोडून नोकरी करावी लागली, तर काही साधकांना घरातील समस्या वाढल्याने पूर्णवेळ सेवा सोडून घरी जावे लागले. कुणाला आर्थिक अडचणी आल्या, तर कुणाचे शारीरिक त्रास वाढले. हे सर्व घडत असतांना साधकांना मानसिक त्रास, द्विधा मनःस्थिती आणि परिजनांचा उपहास यांना सामोरे जावे लागले. विवाह करण्याचा विचार नसतांनाही काही साधकांच्या मनात विवाहाचे विचार येऊ लागले. त्यांच्या मनातील मायेशी संबंधित विचारांचे प्रमाण वाढले आणि ‘माया’ प्रबळ झाली.
२. काळगतीनुसार युधिष्ठिराला द्यूत खेळण्याची बुद्धी होणे आणि त्यानंतर पुढे महाभारताचे युद्ध होणे
नारायण उपनिषदात ‘कालश्च नारायणः ।’, म्हणजे ‘काळ हा श्रीमन्नारायण आहे’, असे म्हटले आहे. श्रीकृष्णावतार घेण्याआधीच श्रीमन्नारायण द्वापरयुग आणि कलियुग यांना बोलावतात अन् त्यांना सांगतात, ‘‘आता द्वापरयुग संपुष्टात येऊन कलियुगाचा आरंभ होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे द्वापरा, तू माझ्या श्रीकृष्णावताराच्या वेळी शकुनीच्या रूपात ये आणि हे कलि, तू दुर्योधनाच्या रूपात ये.’’ ‘श्रीकृष्ण भगवंत आहे’, हे ठाऊक असूनही पांडव द्यूत खेळतांना सर्व विसरतात. ते शकुनीच्या ‘शाकुनी’ विद्येला बळी पडतात आणि सर्व गमावतात. धर्माचा अवतार असलेल्या युधिष्ठिराला द्यूत खेळण्याची आणि सर्व पणाला लावण्याची बुद्धी होते. त्यामुळे त्याला शेवटी १२ वर्षे वनवासाला जावे लागते. कलिपुरुष दुर्योधन वनवासानंतर पांडवांना भूमी द्यायला सिद्ध न झाल्याने शेवटी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महाभारताचे युद्ध होते. महाभारताचे युद्ध झाल्यावर काही वर्षांनी श्रीकृष्णावतार संपतो आणि कलियुगाला आरंभ होतो.
३. ‘कालातीत गुरूंच्या चरणांशी रहाणे’, हाच काळगतीवरचा उपाय असणे
भगवंताचा अवतार कालातीत असतो; कारण काळ त्याच्या अधीन असतो. काळगतीला विरोध करणे शक्य नाही. काळगतीला विरोध करण्यापेक्षा ‘कालातीत गुरूंच्या चरणी शरण जाणे’, हाच काळगतीवरचा उपाय आहे. काळ जड असतो. काळाचा पडदा काळ्या ढगांसारखा आहे. भगवंत ढगांच्या वर असलेल्या आकाशासारखा आहे. जसे विमानातून जातांना ढग दूर झाल्यावर आकाशातून सृष्टी स्पष्ट दिसते, तसे श्री गुरूंना ‘काळ’ स्पष्ट दिसत असतो. त्यांना पडदा नसतो. श्री गुरु सर्वज्ञ असल्याने त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळांचे ज्ञान असते.
आम्हा सर्व साधकांच्या साधनेची नौका कालप्रवाहात अडकलेली आहे. त्या नौकेला दिशा देणारे दीपस्तंभ म्हणजे श्री गुरु होत ! या विश्वात कोट्यवधी जिवांना ‘गुरु’ म्हणजे कोण ? त्यांचा महिमा काय ? ते काय करतात ?’, हेही ठाऊक नाही. असे असतांना आम्हा साधकांचे भाग्य आहे की, आम्हाला सनातनचे तीन गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) लाभले आहेत. पांडव द्युतात हरले; मात्र त्यांची श्रीकृष्णावर अनंत निष्ठा होती. शेवटपर्यंत त्यांनी श्रीकृष्णाचे चरण सोडले नाहीत; म्हणून कठीण काळावरही ते मात करू शकले. आपले तर अहोभाग्य आहे की, साक्षात् श्रीमन्नारायण गुरुदेवांच्या रूपात आले आहेत; म्हणून काळगतीवरचा एकमेव उपाय म्हणजे कालातीत गुरूंचे चरण घट्ट धरून रहाणे.
४. येणारे नूतन शोभन संवत्सर हे ‘समर्पणभाव’ आणि ‘शरणागतभाव’ वाढवण्याचे वर्ष आहे !
मागच्या वर्षात ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ हा साधनेचा मंत्र होता. हा मंत्र आपल्या सर्वांना येत्या संवत्सरातही लागू होतो; मात्र नूतन शोभन संवत्सर हे सर्व साधकांसाठी ‘समर्पणभाव’ आणि ‘शरणागतभाव’ वाढवण्याचे वर्ष आहे. ज्या कार्यासाठी भगवंताने आपल्याला पृथ्वीवर आणले, तसेच सनातनच्या तीन गुरूंच्या संपर्कात आणले, ते कार्य म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना !’ सनातनच्या तीन गुरूंच्या ‘धर्मसंस्थापने’च्या कार्यासाठी सर्व साधकांनी त्यांचे जीवन समर्पित केले आहे. ‘ते समर्पण टिकवून ठेवणे आणि सनातनच्या तीन गुरूंना शरण जाणे’, एवढेच आपल्याला करायचे आहे. प.पू. भक्तराज महाराज नेहमी म्हणत, ‘‘माझ्याकडे जो येतो, ‘त्याने मागे काय केले ?’, हे मी पहात नाही. ‘त्याच्याकडून पुढे काय करून घ्यायचे आहे ?’, एवढेच मी पहातो, म्हणजे श्री गुरु साधकाच्या भूतकाळाकडे पहात नाहीत. ते केवळ त्याच्या भविष्याचा विचार करतात आणि त्याच्याकडून साधना करून घेतात.
५. सनातनच्या तीन गुरूंच्या चरणी प्रार्थना !
सनातनचे तिन्ही गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी प्रार्थना आहे, ‘आम्हा साधकांना कठीण कालप्रवाहात साधनेचा मार्ग दाखवावा. गुरुकृपा अखंड रहाण्यासाठी आमच्याकडून अखंड सेवा करून घ्यावी. ‘तीन गुरूंची सेवा’, हाच आमचा श्वास होऊ दे. ‘तीन गुरूंच्या प्रती समर्पण’, हेच आमचे नित्य-जीवन व्हावे. आजच्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी आम्ही सनातनचे सर्व साधक सनातनच्या तीन गुरूंच्या चरणी शरण आलो आहोत. ‘आम्हाला तुमच्या चरणांशी ठेवा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), देहली (१२.३.२०२३)