भारतीय सैन्य उत्तरेत व्यस्त असतांना दक्षिण भारत कह्यात घेण्याचे होते पी.एफ्.आय.चे लक्ष्य !

एन्.आय.ए.च्या आरोपपत्रात माहिती !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – पाकिस्तानमध्ये अशांती असल्याने भारतीय सैन्य उत्तर भारतात व्यस्त असणार, त्या वेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पी.एफ्.आय.चे) प्रशिक्षित कार्यकर्ते दक्षिण भारत कह्यात घेऊन उत्तर भारताच्या दिशेने चाल करू शकतात, असे षड्यंत्र पी.एफ्.आय.ने रचले होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) या पी.एफ्.आय.च्या ५ कार्यकर्त्यांच्या विरोधात न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. या कार्यकर्त्यांकडून हस्तगत केलेल्या कागदपत्रांवरून वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचा पी.एफ्.आय.चा कट असल्याचे उघड झाले होते. पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. याची माहिती मिळाल्यानंतरच या संघटनेवर बंदी घालण्यात आली.

या आरोपपत्रात म्हटले आहे की, चौकशीत लक्षात आले की, पी.एफ्.आय.ने सशस्त्र बंडखोरी करून सरकार उलथवून तेथे इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या लक्ष्यासाठी रणनीती सिद्ध केली होती. यात सदस्यांची गुप्तपणे भरती करून आणि त्यांचे सैन्य निर्माण करून त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. या रणनीतीसुसार हिंदु संघटना आणि पी.एफ्.आय.ला विरोध करणारे यांची सूची बनवून त्यांना लक्ष्य करण्यात येणार होते.