सावंतवाडी, २० मार्च (वार्ता.) – अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाकडून बसस्थानक स्वच्छता मोहीमेची घोषणा करण्यात आली असली, तरी सावंतवाडी बसस्थानक पाहिल्यास ‘स्वच्छता मोहीम आणि सावंतवाडी बसस्थानक यांचा संबंध काय ?’ असा प्रश्न पडावा, इतकी अस्वच्छता या बसस्थानकावर आहे. स्वच्छता मोहीम घोषित करून ३ मास उलटले, तरी साधी कचरा टाकण्याची सुविधाही या बसस्थानकावर करण्यात आलेली नाही. बसस्थानकातील प्रसाधनगृहाच्या बाहेर उघड्यावरच सर्व कचरा टाकला जातो. त्यामुळे उघड्यावर प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य कचरा यांचा खच पडला आहे.
सावंतवाडी बसस्थानकाच्या परिसराचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे बसगाड्यांमुळे उडणार्या धुळीने बसस्थानकासह संपूर्ण सर्व परिसर धुळीने माखला आहे. अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची असुविधा आणि अत्यंत अस्वच्छ प्रसाधनगृह यांमुळे सावंतवाडी बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची पाणपोई आहे; मात्र त्यातील केवळ एकच नळ चालू आहे. ‘पाणी जपून वापरा’, ‘स्वच्छता राखा’ असा फलक पाणपोईवर लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणपोईवर इतकी धूळ साचली आहे की, पाणी पिण्यासाठी तेथे कुणी फिरकतही नाही. बसस्थानकावर एस्.टी.कडून दिल्या जाणार्या सवलतींची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत; मात्र ते धुळीने इतके माखले आहेत की, त्यांवरील लिखाण वाचणेही अशक्य आहे. फाटलेली आणि अर्धवट निघालेली भित्तीपत्रके बसस्थानकांच्या भिंतींना तशीच लटकत आहेत. बसस्थानकावरील प्रवाशांसाठी असलेल्या प्रसाधनगृहातील टाईल्स तंबाखूच्या पिचकार्यांनी विद्रूप झाल्या आहेत.
उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्ष बंद !
बसस्थानकावर सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेल्या पोलीस कक्षाचे पटल आणि आसंद्या धुळीने माखल्या आहेत. त्याचा उपयोग होत नाही. बसस्थानकावरील उपाहारगृह, हिरकणी कक्ष (महिलांसाठीचा कक्ष) आणि पोलीस नियंत्रण कक्ष बंद आहेत.
स्थानकप्रमुखांनी बसस्थानकाच्या दुरवस्थेविषयी भाष्य करण्याचे टाळले !दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने बसस्थानकाच्या विविध समस्यांविषयी स्थानकप्रमुखांना विचारणा केली असता नवीन बसस्थानक बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र बसस्थानकाच्या सध्याच्या दुरवस्थेविषयी भाष्य करण्याचे टाळले. |