(म्हणे) ‘अमृतपाल याला खोट्या चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो !’ – कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनेचा आरोप

‘द वर्ल्ड सिख ऑर्गनायझेशन ऑफ कॅनडा’चा अध्यक्ष तेजिंदर सिंह सिद्धू

ओटावा (कॅनडा) – येथील खलिस्तानवादी संघटना ‘द वर्ल्ड सिख ऑर्गनायझेशन ऑफ कॅनडा’ने (‘डब्ल्यू.एस्.ओ.’ने) खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याला अटक करण्यास विरोध केला आहे. या संघटनेने आरोप केला आहे की, पोलीस खोट्या चकमकीत अमृतपाल आणि शीख कार्यकर्त्यांना ठार मारू शकतात. भारत सरकारने अमृतपाल आणि त्याचे साथीदार यांना अटक करण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही.

या संघटनेचा अध्यक्ष तेजिंदर सिंह सिद्धू याने म्हटले आहे की, पंजाब राज्यात इंटरनेट बंद करून अर्धसैनिक दल तैनात करणे अनाकलनीय आहे. राज्यात अशा प्रकारचा आदेश देणे नरसंहराचे कारण ठरलेले आहे. वर्ष १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडामध्येही असा वापर करण्यात आला होता. सरकारने सतत ‘शीख समान नागरिक नाहीत आणि त्यांचे अधिकार गोठवले जाऊ शकतात’, असे म्हटल्याचा आरोपही त्यांनी केला. (तोंड आहे म्हणून बोलणारे खलिस्तानी ! – संपादक) अमृतपाल सिंह पंजाबमध्ये व्यसनाधीन तरुणांना व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. सरकारने तस्करांऐवजी त्याच्यावर कारवाई केली. (अमृतपाल या तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना आत्मघाती आक्रमणांसाठी सिद्ध करत होता, अशीच माहिती उघड झाली आहे ! – संपादक) अमृतपाल याची अटक अफवा असल्याचे सांगून त्याला खोट्या चकमकीत ठार मारण्यासाठी केलेला हा प्रयत्न होऊ शकतो, असाही आरोप सिद्धू याने केला.

संपादकीय भूमिका

खलिस्तानवाद्यांचा हा आरोप म्हणजे बचावाचे आणि दबावाचे धोरण आहे. उद्या प्रत्यक्ष जरी चकमक झाली आणि त्यात अमृतपाल ठार झाला, तर पोलिसांवर अन् भारत सरकारवर आरोप करण्यास खलिस्तानवादी मोकळे !