भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न भारतीय अधिकार्‍याने हाणून पाडला !

लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांकडून भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण !

खलिस्तानवाद्यांचे भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण (डावीकडे) खलिस्तानवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत उच्चायुक्तालयावर फडकावण्यात आलेला भव्य तिरंगा ध्वज (उजवीकडे)

लंडन (ब्रिटन) – लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांनी भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्यांनी उच्चायुक्तालयावरील भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्या वेळी भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकार्‍याने  धाडस दाखवत खलिस्तानवाद्यांना विरोध केला आणि खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणांकडून खलिस्तानी ध्वज हिसकावून घेऊन तो फेकून दिला. या घटनेनंतर खलिस्तानवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय उच्चायुक्तालयावर भव्य तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. ‘वारीस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) संघटनेचा प्रमुख खलिस्तानवादी अमृतपाल सिंंह याच्यावर भारतात कारवाई चालू आहे. या कारवाईमुळे खलिस्तान समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील आक्रमण हे या घटनेच्या निषेधाचा भाग आहे.

१. लंडन पोलिसांनी सांगितले की, या आक्रमणामध्ये २ सुरक्षा कर्मचार्‍यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी चौकशी चालू करण्यात आली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

२. लंडनचे महापौर सादिक खान यांनी ट्वीट करून म्हटले की, या प्रकारच्या कृतींना आमच्या शहरामध्ये कोणतेही स्थान नाही.

३. भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त अ‍ॅलेक्स एलिस यांनी या घटनेला अपमानजनक म्हटले आहे.

भारत सरकारने ब्रिटनच्या उच्चायुक्तांकडे मागितले स्पष्टीकरण !

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयांकडे लंडनमधील घटनेविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी एक निवेदन प्रसारित करून म्हटले आहे की, भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारात ही घटना घडली, तेव्हा सुरक्षा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते. याविषयी ब्रिटनच्या उच्चायुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे.

ब्रिटन सरकार सुरक्षेकडे गांभीर्याने पाहील !

ब्रिटीश सरकार लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेचे सूत्र गांभीर्याने घेईल, असे ब्रिटनच्या एका उच्च अधिकार्‍यांनी सांगितले. उच्चायुक्तालयातील तोडफोड अपमानजनक आणि अस्वीकार्य असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया अमेरिका आदी देशांमध्ये खलिस्तानवादी भारतीय दूतावास आणि हिंदूंची मंदिरे यांवर आक्रमण करत असतांना या देशांकडून कोणतीही कठोर कारवाई होतांना दिसत नाही. आता भारत सरकारने, तसेच भारतीय जनतेने या देशांच्या विरोधात कठोर होण्याची आवश्यकता आहे !