गोवा : कुळे ते वास्को रेल्वे दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची वाट मोकळी

पर्यावरणीय आक्षेप फेटाळले !

रेल्वे दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची वाट मोकळी

पणजी, १९ मार्च (वार्ता.) – दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या कुळे ते वास्को रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यास नागरिकांनी पर्यावरणावर आधारित उपस्थित केलेले आक्षेप फेटाळून लावत भूसंपादन प्राधिकरणाने भरपाई नोटीस जारी केली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ९९ सहस्र ८५० चौरसमीटर भूमी संपादित केली जाणार असून यात कुडचडे, काकोडा, सावर्डे, शेल्डे, सां जुझे दि आरियल, चांदोर, गिर्दाेली, वेळसांव आणि इसोर्शी या गावांचा समावेश आहे. वास्कोच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने हॉस्पेट-हुब्बळ्ळी-तिनईघाट-वास्को या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पाविषयी सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. हा प्रकल्प रेल विकास निगम लिमिटेड करत आहे. यासाठीची भूमी रेल्वे मंत्रालयाची दक्षिण-पश्चिम रेल्वे अधिग्रहित करणार आहे.

रेल्वे दुपदरीकरणाचे काम चालू असतांना (संग्रहित छायाचित्र)

मुरगावचे उपजिल्हाधिकारी आणि विशेष विभागीय अधिकारी यांना या विशेष प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठीचे अधिकार असतील. यासंबंधी जारी केलेल्या नोटिसीमध्ये दुपदरीकरणाच्या मार्गावरील भूमीचे तेथील वास्तूसह संक्षिप्त वर्णन असून ज्या कुणाला भरपाई मिळणार आहे, त्यांची नावे आहेत. दक्षिण-पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील ३५२.५८ कि.मी. मार्गापैकी ७५.१६ टक्के रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३ सहस्र ६९२ कोटी आहे.

भूसंपादन प्राधिकरणाने सर्व २६ आक्षेप फेटाळले !

या प्रकल्पाला विरोध करतांना नागरिकांनी एकूण २६ आक्षेप नोंदवले होते. यात पर्यावरणाच्या हानीच्या संदर्भात आणि मार्ग पूर्ण झाल्यावर कर्नाटकातून खनिज वाहतूक चालू होईल, या संदर्भात सूत्रे उपस्थित करणारे २० आक्षेप होते.

यातील १० आक्षेप थेट फेटाळण्यात आले, तर उर्वरीत १० आक्षेप फेटाळण्यापूर्वी सुनावणी घेण्यात येऊन ‘हे आक्षेप सक्षम प्राधिकरणाच्या कक्षेत नाहीत’, असे कारण देण्यात आले.

माहितीसाठी –
गोव्यातील रेल्वे रुळांचे दुहेरीकरण रोखण्यासाठी ‘द वायर’ सारखी प्रसारमाध्यमे आणि एनजीओ  एकत्र कसे आले आणि ते कसे चुकीचे आहेत, ते पहा –