शब्दांकन – पंचांगकर्ते श्री. मेघ:श्याम वसंत लाटकर, कोल्हापूर
कोल्हापूर येथील प्रसिद्ध असलेले आणि धर्मपीठ मान्यताप्राप्त असलेले ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ गुढीपाडव्यास ११४ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने त्याचा प्रारंभ कसा झाला ? त्याची वैशिष्ट्ये, तसेच अन्य माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
१. वर्ष १९१० मध्ये कै. शंकरशास्त्री गणेश लाटकर यांच्याकडून पंचांगास प्रारंभ !
‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ हे वर्ष १९१० मध्ये कै. शंकरशास्त्री गणेश लाटकर यांनी प्रथम सिद्ध केले. ते वैदिक, तसेच श्री महालक्ष्मीदेवीचे पारंपरिक पूजकांचे उपाध्ये होते. वर्ष १९५२ मध्ये त्यांच्या निधनानंतर वासुदेव शंकर तथा नाना लाटकर यांनी त्यांची परंपरा पुढे चालवली. त्यांना त्यांचे थोरले बंधू कै. वसंत लाटकर हेही साहाय्य करत. कै. वसंत लाटकर हे चित्रपट अभिनेते, गायक होते. वर्ष १९८९ मध्ये कै. नाना लाटकर यांच्या निधनानंतर श्री. मेघ:श्याम वसंत लाटकर हे पंचांगाचे काम पाहू लागले. श्री. मेघ:श्याम हे व्यवसायाने वास्तूविशारद; परंतु नानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पंचांगशास्त्राचे शिक्षण झाल्यामुळे त्यांनी याच व्यवसायात लक्ष घातले. सध्या श्री. मेघ:श्याम वसंत लाटकर हेच पंचांग सिद्ध करतात, तसेच त्यांचा पुतण्या श्री. भालचंद्र तथा श्री. किरण हे श्री महालक्ष्मीदेवीच्या पूजकांचे उपाध्येही आहेत.
२. अचूक धर्मशास्त्रीय निर्णय !
पंचागाचे गणित करून मांडणी केल्यावर धर्मशास्त्रीय निर्णय घेणे अवघड असते. विद्वानांचे त्यात मतभेद असतात. अनेक संस्कृत ग्रंथ, संदर्भ पडताळून निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. सुदैवाने कोल्हापुरातील राष्ट्रीय पंडित कै. प.पू. बाळाचार्य खुपेरकर शास्त्री (?), वेदशास्त्र संपन्न पंडित श्रीपादशास्त्री जेरे, वेदशास्त्रसंपन्न कै. म.वि. तथा बंडूनाना धर्माधिकारी, गारगोटीचे वेदशास्त्रसंपन्न कै. कृष्णम्काका शुक्ल यांचे मार्गदर्शन लाभले.
३. पंचांगातील फेरबदल !
पूर्वीच्या काळी पंचांगातील वेळ ही ‘घटी-पळा’मध्ये होती. तिथी, वार इत्यादी माहिती संक्षिप्त स्वरूपात होती. त्यामुळे रकाने क्लिष्ट होत होते. तसेच अवकहडाचक्राची (?) मांडणी गोलाकार असे. आता पंचांगातील वेळ ही प्रतिदिनच्या घड्याळ्याप्रमाणे (स्टँडर्ड् टाइम) असते. तसेच मुद्रणातील नवीन तंत्रज्ञानामुळे संक्षिप्त रूपे काढून पूर्ण शब्द देणे शक्य झाले. त्यामुळे ते कळण्यास सोपे झाले.
या पंचांगात दैनंदिन मुहूर्त आहेतच, याखेरीज तिथी शुद्धीप्रमाणे उत्तम आणि मध्यम दिवस असे तिथीमान दिले आहे. तसेच इतर पंचांगात न आढळणारे चातुर्मासातील आणि गुरु शुक्राच्या अस्तातील विवाह मुहूर्त दिले आहेत. त्यासाठी विविध ग्रंथांतील वचने सविस्तरपणे दिली आहेत. अशी वचने इतर पंचांगात आढळत नाहीत. पौरोहित्य वर्गासाठी योग, तिथी, मास यांच्या देवता आणि स्वामी, जननशांतीची सविस्तर माहिती, तसेच वयाच्या ५० ते १०० वर्षे या कालावधीत केल्या जाणार्या शांतीची माहिती जी इतरत्र आढळत नाही, त्याचीही माहिती उत्तम प्रकारे दिली आहे.
४. सुटसुटीत आणि वाचनीय पंचांग !
पूर्वीच्या काळी पंचांग हे जाणकारांनाच कळत असे; परंतु आता सर्वसामान्य माणूसही ते वाचू शकतो. पंचांग कसे पहावे ? धर्मशास्त्रीय संदर्भ, पंधरवड्याच्या पानांखाली उपयुक्त माहिती. त्यामुळे ते सुटसुटीत आणि वाचनीय झाले आहे हे निश्चित !
(अधिक माहितीसाठी संपर्क – कोल्हापूर लाटकर पंचांग, श्री. मेघ:श्याम वसंत लाटकर, १५२, बी, महाद्वार रोड, कोल्हापूर. दू.क्र. (०२३१) २५४१५७४ भ्र.क्र. ९४०३६०२३३१)