अमृत महोत्सवी वर्षी एस्.टी.वर साडेतेरा सहस्र कोटी रुपये तोट्याचा भार घेऊन धावण्याची वेळ !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

एस्.टी.चे उत्पन्न वाढण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक !

७५ वर्षे पूर्ण झालेल्या एस्.टी.चे २०२३ हे ‘अमृत महोत्सवी’ वर्ष आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यानिमित्ताने ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेतली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी याविषयी सूचना दिल्या आहेत. एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी डिसेंबर २०२२ मध्ये आगारप्रमुखांची बैठक घेऊन स्वच्छतेचा कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. मोहीम चालू होऊन ३ मास झाले आहेत. राज्यातील विविध बसस्थानके स्वच्छ केल्याची अनेक छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारितही करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी विविध जिल्ह्यांतील बसस्थानकांवर प्रत्यक्ष जाऊन तेथील स्थिती जाणून घेतली. काही ठिकाणी तेथील प्रमुख, चालक-वाहक, प्रवासी यांच्याशी संवाद साधला. या वेळी मात्र एस्.टी. बसस्थानकांची विदारक स्थिती आढळून आली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त का होईना, बसस्थानकांची स्वच्छता होईल, बसस्थानकावर प्रवाशांना किमान पिण्याचे शुद्ध पाणी, बसण्यासाठी बाकडे, स्वच्छ प्रसाधनगृहे आदी मूलभूत सुविधा तरी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. ‘प्रवाशांदा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याविषयी उदासीन असणारे महामंडळ प्रवाशांना आकृष्ट करण्याचे उद्दिष्ट कसे साध्य करणार ?’ हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार एस्.टी.ने खर्‍या अर्थाने सेवेत सुधारणा करावी. ब्रीदवाक्याप्रमाणे खरोखरच कारभार केल्यास एस्.टी.ला गतवैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. ‘एस्.टी. आपली आहे. आर्थिक गर्तेत अडकलेल्या एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. याच भूमिकेतून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी राज्यातील बसस्थानकांचा घेतलेल्या आढाव्याची वृत्तमालिका आम्ही प्रसिद्ध करत आहोत. शासकीय, प्रशासकीय, जनता आणि प्रामुख्याने एस्.टी. महामंडळ या सर्व स्तरांवर एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न व्हावेत, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – वर्ष २०२३ या अमृत महोत्सवी वर्षी १३ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या संचित तोट्याचा भार घेऊन धावण्याची वेळ एस्.टी.वर आली आहे. एस्.टी. महामंडळाचा प्रतिमासाचा व्यय ७८० कोटी रुपये आहे. यामध्ये ३८० कोटी रुपये केवळ वेतनावर व्यय होत आहेत. प्रतिमासाचा इंधनाचा व्यय १२ कोटी रुपये इतका प्रचंड आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेले एस्.टी. महामंडळ चालू ठेवणे, हे केवळ राज्यशासनाच्या धोरणावर अवलंबून आहे.

वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकारने एस्.टी.साठी १ सहस्र ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी सरकारकडून निधी दिला जातो. सरकारकडून निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्मचार्‍यांचे वेतन रखडते. डिसेंबर २०२२ मध्ये राज्य सरकारला एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी २२३ कोटी रुपये द्यावे लागले. जानेवारी २०२३ मध्ये २२४ कोटी ७४ लाख, तर फेब्रुवारीमध्ये १०० कोटी रुपये द्यावे लागले. वेतनावर होणारा आणि अन्य व्यय लक्षात घेऊन या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एस्.टी. महामंडळासाठी अधिकची तरतूद करावी लागणार आहे. यासह एस्.टी.चे उत्पन्न वाढण्यासाठी ठोस उपाययोजना काढाव्या लागणार आहेत.