काळेवाडी (जिल्हा पुणे) – पिंपरीगाव ते काळेवाडी रस्त्यालगत असलेल्या पवनेश्वर मंदिरासमोरील स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पवनेश्वर मंदिरात शहराच्या विविध भागांतून भक्तगण दर्शनासाठी येतात. या मंदिरात सोमवारी आणि सायंकाळी मोठी गर्दी असते. या स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याविषयी तेथील नागरिकांनी सांगितले की, स्वच्छतागृहांची दिवसातून दोनदा केमिकलचा उपयोग करून स्वच्छता करणे ठेकेदारास बंधनकारक असते; मात्र स्थानिक पुढारी आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून या नियमाकडे डोळेझाक केली जाते. येथील स्वच्छतागृहाची स्वच्छता होत नसल्याने लोक दुर्गंधीमुळे बाहेरच लघुशंका करतात. ती थेट मंदिराच्या समोर येते. (चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांची अशी स्थिती होणे, हे लज्जास्पद आहे ! – संपादक) येथे महिला आणि लहान मुले येतात. त्यांनाही हे चित्र पहावे लागते.
संपादकीय भुमिकाअशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? यावरून मंदिरांविषयी प्रशासन किती असंवेदनशील आहे हे दिसून येते ! |