आम्ही अमेरिकेचे ड्रोन पाडलेले नाही ! – रशिया

मॉस्को – रशियाच्या लढाऊ विमानांनी १५ मार्चला अमेरिकेचे ड्रोन ‘एम्क्यू-९’ पाडले, असा आरोप अमेरिकेने केला आहे. रशियाची विमाने आणि अमेरिकी ड्रोन काळ्या समुद्रावर घिरट्या घालत असतांना ही घटना घडल्याचे अमेरिकने म्हटले आहे. तथापि आम्ही अमेरिकेचे कुठलेही ड्रोन पाडले नसल्याचा खुलासा रशियाने केला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रात गेल्या अनेक मासांपासून तणाव आहे. रशिया आणि अमेरिका यांची विमाने येथे अनेकदा उड्डाण करत असतात; परंतु दोन्ही विमाने समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेने सांगितले की, रशियाच्या एस्यू-२७ या दोन लढाऊ विमानांनी त्यांच्या ड्रोनला धडक देऊन काळ्या समुद्रात पाडले. अमेरिकेच्या हवाई दलाचे जनरल जेम्स हॅकर यांनी रशियाची कृती अत्यंत दायित्वशून्य आणि प्रक्षोभक असल्याची म्हटले आहे. दुसरीकडे रशियाने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आहे.