आनंदी, हसतमुख आणि सतत देवाच्या अनुसंधानात असणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. प्रार्थना महेश पाठक ही या पिढीतील एक आहे !

फाल्गुन कृष्ण प्रतिपदा (८.३.२०२३) या दिवशी पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक हिचा १२ वा वाढदिवस झाला.

जानेवारी २०२३ मध्ये कु. प्रार्थना तिची आई सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) आणि वडील श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांच्या समवेत एका सेवेसाठी पुण्यातील हडपसर भागात निवासाला होती. वयाने लहान असूनही ती विविध परिस्थितीत सतत आनंदी आणि स्थिर होती. पुणे जिल्ह्यातील साधकांना तिच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘कु. प्रार्थना महेश पाठक महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची ६७ टक्के पातळी आहे’, असे वर्ष २०२० मध्ये घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची पातळी ६८ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.३.२०२३)

१. सौ. रीमा नांनीकर, पुणे

कु. प्रार्थना पाठक

१ अ. आई रुग्णाईत असतांना स्थिर राहून तिला साहाय्य करणे : ‘एकदा सेवेच्या वेळी मनीषाताईला (कु. प्रार्थना हिच्या आईला) ‘सलाईन’ लावण्यासाठी रुग्णालयात नेले होते. तेव्हा प्रार्थनाही समवेत होती. त्या वेळी ‘आईला बरे नाही. आता कसे होणार ?’, असा विचार तिच्या मनात आला नाही. ती स्थिर होती. ती आईला सर्वकाही साहाय्य करते; पण त्यात अडकत नाही.

१ आ. रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्याशी तिची लगेच जवळीक झाली.

१ इ. सकारात्मकता : अनेक वेळा प्रार्थनाला मनीषाताईच्या समवेत प्रसारासाठी, तर कधी कार्यशाळेसाठी दूरच्या गावांमध्येही जावे लागायचे, तरीही ती कधी थकलेली दिसली नाही. याविषयी तिने कधी मनीषाताईकडे गार्‍हाणेही केले नाही. ती प्रत्येक स्थितीत सकारात्मक रहात होती.

१ ई. समजूतदारपणा : कधी कधी मनीषाताईला रात्री येण्यास विलंब होत असे. तेव्हा प्रार्थनाला झोप आली असली, तरी तिने कधी चिडचिड केली नाही. एवढ्या लहान वयात ‘समजूतदारपणा, हसतमुख रहाणे, साधकांशी प्रेमाने बोलणे, लहान मुलांशी खेळणे’, हे गुण मला तिच्याकडून शिकता आले.

१ उ. खेळण्यांविषयी आसक्ती नसणे : एकदा मी आणि अक्षरा (माझी ५ वर्षांची मुलगी) सेवेसाठी महेशदादांच्या समवेत होतो. तेव्हा महेशदादांनी प्रार्थनासाठी एक खेळणे आणले. ते अक्षराला आवडले; म्हणून तिने ते घेतले. महेशदादांनी प्रार्थनाला ‘अक्षराला खेळणे खेळायला देतेस का ?’, असे विचारल्यावर तिने अतिशय सहजतेने होकार दिला. त्या खेळण्याविषयी तिच्या मनात तीळमात्रही आसक्ती नव्हती. अक्षरा ते खेळणे घरी घेऊन यायची, तरीही प्रार्थनाने त्या संदर्भात कधीच गार्‍हाणे केले नाही.’

२. सौ. प्रीती कुलकर्णी, पुणे

२ अ. ‘तिच्या वाणीत अतिशय माधुर्य आणि नम्रता आहे. ‘तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. तिचे बोलणे आध्यात्मिक स्तरावरचे असते.

२ आ. खाण्या-पिण्याविषयी आवड-नावड नसणे : प्रार्थना महाप्रसादात जे असेल, ते मनापासून घ्यायची. ती रात्री राहिलेला महाप्रसाद दुसर्‍या दिवशी सकाळी शाळेत जातांना डब्यात घेऊन जायची. ती लहान असूनही ‘डब्यात एखादा पदार्थ हवा’, असे तिने कधी सांगितले नाही.

२ इ. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे : प्रार्थना दैवी बालकांचा सत्संग घेते. एकदा ती एका खोलीत सत्संग घेण्यास बसली होती. तेव्हा तेथे अन्य सत्संग असल्याने तिला दुसर्‍या खोलीत जायला सांगितले. पुन्हा काही वेळाने काही अडचणीमुळे तिला पहिल्या खोलीत बसायला सांगितले. सत्संगाची वेळ होत आली होती, तरीही हे पालट ती सहजतेने स्वीकारत होती. काही मिनिटांतच तिने सत्संग घ्यायला आरंभ केला आणि ती भावस्थितीत गेली. यातून ‘तिच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प आहेत’, हे लक्षात येते.

२ ई. प्रार्थना शाळेतून आल्यावर कधी आई-बाबांच्या समवेत, तर कधी साधकांच्या समवेत सेवा करते. तेव्हा ‘ती सेवेशी एकरूप झाली आहे’, असे जाणवते.

२ उ. सतत देवाच्या अनुसंधानात असणे : एकदा मी प्रार्थनाला शाळेतून हडपसरला घेऊन गेले होते. तेव्हा पूर्ण प्रवासात तिचा नामजप चालू होता. त्या वेळी ‘ती गुरुदेव किंवा श्रीकृष्ण यांना अनुभवत होती’, असे मला जाणवले. तिच्यामुळे माझाही पूर्ण प्रवासात सतत नामजप झाला.’

३. सौ. छाया राऊत, हडपसर, पुणे

अ. ‘कु. प्रार्थना हिचे प्रतिदिन नियोजन ठरलेले असायचे. तिने कधीही अनावश्यक वेळ वाया घालवला नाही. काही सेवा नसल्यास ती व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत असे.

आ. ती प्रत्येक कृती मनीषाताईला विचारून करत असे.’

४. सौ. स्नेहल पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)

४ अ. आई सेवेत व्यस्त असतांना ‘तिने आपल्याला वेळ द्यावा’, असे न वाटणे : ‘एका सेवेसाठी अनेक साधक रहायला येणार होते, तसेच काही साधक येऊन-जाऊन सेवा करत होते. मनीषाताई ‘सर्व साधकांचे नियोजन करणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे’, या सेवा करत होती. ती व्यस्त असतांना ‘आईने आपल्याला वेळ द्यावा’, असे प्रार्थनाला कधी वाटले नाही. ती नेहमी आध्यात्मिक स्तरावर विचार करते.

४ आ. आईला वैयिक्तक कृती करतांना साहाय्य करणे : मनीषाताईला शारीरिक त्रासांमुळे वैयक्तिक कृती करतांना साहाय्य लागते. त्या वेळी प्रार्थना तिला सर्व साहाय्य करते. ‘आईला औषध देणे, तिला अंघोळीचे पाणी काढून देणे, तिचे कपडे घडी घालून व्यवस्थित ठेवणे’, अशा अनेक कृती प्रार्थना करत होती.

४ इ. प्रार्थनाला सेवेविषयी काहीच आवड-नावड नाही. ती आपण सांगू, ती सेवा मनापासून करते.

४ ई. ती तिच्याकडून झालेल्या चुका नियमितपणे फलकावर लिहिते. ‘चुका होऊ नयेत’, यासाठी ती सतर्क आणि अंतर्मुख असते.

४ उ. कु. प्रार्थनाच्या समवेत सेवा करतांना आलेल्या अनुभूती

१. प्रार्थना समवेत असतांना माझे मन आनंदी असते.

२. जेव्हा ती कृष्णाविषयी बोलत असते, तेव्हा मलाही कृष्णाची पुष्कळ आठवण येते.

३. एकदा प्रार्थनाला घेऊन मला अन्य ठिकाणी निवासाला जायचे होते. तेव्हा मला दुचाकी चालवतांना पुष्कळ हलकेपणा जाणवत होता. ‘दुचाकी आपोआप पुढे जात आहे’, असे मला वाटले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३.३.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.